मुंबई : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली होती. काही अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
लिलावती रुग्णालयात केलं होतं दाखल : गोळीबारानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत.
हल्लेखोरांचा शोध सुरू : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे खेरनगर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांचा लीलावती रुग्णालयात मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तीन हल्लेखोरांकडून या गोळ्या झाडण्यात आल्या असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेl.
तिघांनी घातल्या गोळ्या : बाबा सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते. तसेच आमदार झिशान सिद्दिकी यांचे ते वडील होते. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेरच तीन अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांना तीन गोळ्या लागल्या असून, एक गोळी छातीत लागली, तर त्यांच्या सहकाऱयाच्या पायालाही एक गोळी लागली आहे. हल्लेखोर पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कोण आहेत बाबा सिद्दिकी? : बाबा सिद्दिकी हे मुंबईतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. 3 वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग 3 वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.