मुंबई Narayan Rane : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच त्याचा सर्वाधिक फटका नारायण राणे यांना बसलाय. अशोक चव्हाण यांच्यामुळं राणेंची दुसऱ्यांदा राजकीय गोची झालीय.
राणेंची राजकीय गोची : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसला रामराम करत मंगळवारी भाजपाचं कमळ हातात घेतलंय. भाजपा प्रवेशाबद्दल चव्हाण यांनी कोणतंही कारण अथवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. उलट पक्षानं आपल्याला खूप दिलं आणि आपणही पक्षाला दिलं, असं सांगत त्यांनी काँग्रेसचा 'हात' अलगद सोडला. मात्र, अशोक चव्हाण यांच्या भाजपामधील प्रवेशानं पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची चांगलीच राजकीय गोची झाल्याचं दिसून येतंय.
राणेंना स्वतःला सिद्ध करावं लागणार : यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी सांगतात, "नारायण राणे हे आता पक्षाला भार वाटण्याची शक्यता आहे. राणेंच्या राजकीय कारकिर्दीच्या आलेखाला आता काहीसा उतार लागलाय. राणे यांची ताकद असताना पक्षानं त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आणि केंद्रात मंत्रिपदही दिलं. काँग्रेसमधून बाहेर पडून कोकणात भारतीय जनता पक्षाची ताकद राणे वाढवतील आणि पक्षाला त्याचा फायदा होईल अशी अटकळ होती. मात्र, गेल्या सहा वर्षात कोकणात राणेंची ताकद वाढण्याऐवजी ती मर्यादित होत जाताना पाहायला मिळतंय. त्यामुळं राणेंना आता राज्यसभा न देता लोकसभा लढवण्यासाठी सांगितलं जाण्याची शक्यता आहे. त्यांना पुन्हा त्यांची राजकीय उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे."
अशोक चव्हाण यांच्यामुळं दुसऱ्यांदा खो : नारायण राणे हे काँग्रेस पक्षामध्ये असताना विलासराव देशमुख यांच्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून नारायण राणे यांच्याकडं पाहिलं जात होतं. मात्र, विलासराव देशमुख यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर ती आपल्याकडे मिळेल, असं वाटत असतानाच नारायण राणे यांच्याकडून ती संधी अशोक चव्हाण यांनी हिसकावून घेतली आणि ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राणे यांनी पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर प्रचंड आगपाखड करत पक्षावर टीका केली. राणे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश करून पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भाजपानंही त्यांना केंद्रात मंत्रिपद देत राज्यसभा दिली. मात्र आता पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करत नारायण राणे यांच्याकडून राज्यसभा हिसकावून घेतलीय असं जोशी म्हणाले. त्यामुळं पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्यामुळं राणेंची राजकीय गोची झालीय. आता राणे पिता-पुत्रांना स्वतःची ताकद आणि उपयुक्तता सिद्ध करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असंही जोशी यांचं म्हणणं आहे.
राणे यांनी वांद्रे येथून लढवलेली विधानसभा निवडणूक आणि आताची राज्यसभा निवडणूक यांच्यातही सामायिक धागा आहे. वांद्रेमधून निवडणूक लढण्यास राणे इच्छुक नसतानाही त्यांना अशोक चव्हाण यांनी भरीस पाडलं आणि राणे त्या सीटसाठी लढले आणि पराभूत झाले. यावेळी अशोक चव्हाण यांना संधी मिळाली आणि राणे यांची संधी हुकली. आता राणे यांना इच्छा नसतानाही लोकसभा लढवावी लागणार असं दिसतंय. यावेळीही निमित्त अशोक चव्हाण ठरले आहेत.
हेही वाचा :