नांदेड Vasantrao Chavan Political Journey : काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचा ४६ वर्षांचा राजकीय प्रवास आज थांबला. सोमवारी पहाटे हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांत आणि संयमी खासदार म्हणून त्यांची ओळख होती. सरपंच पदापासून ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांच्या निधनानं नांदेडवर शोककळा पसरली.
राजकीय प्रवासाला कधीपासून झाली सुरुवात? : वसंतराव चव्हाण हे माजी आमदार दिवंगत बळवंत चव्हाण यांचे सुपुत्र. १९७८ साली त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. १९७८ साली नायगाव ग्रामपंचायतमध्ये त्यांची सरपंचपदावर निवड झाली. १९७८ ते २००२ सलग २४ वर्ष ते सरपंच पदावर होते. १९९० साली त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यात त्यांनी विजय देखील मिळवला. १९९० ते २००२ असे दोन टर्मला वसंतराव चव्हाण हे जिल्हा परिषदेत सदस्य राहिले. त्यानंतर वसंतराव चव्हाण यांना २००२ साली राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आलं होतं.
एकदा केली होती बंडखोरी : २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष म्हणून नायगाव बिलोली विधानसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी देखील झाले. त्यानंतर त्यांनी अशोक चव्हाण यांना साथ देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना भाजपा उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला. वसंतराव चव्हाण हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष देखील होते. शांत आणि संयमी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं नांदेडवर शोककळा पसरली.
मंगळवारी होणार अंत्यसंस्कार : खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर दोन आठवड्यापासून उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानं सर्वांना धक्का बसला. दरम्यान, त्यांचे पार्थिव सोमवारी सायंकाळी हैदराबाद येथून नायगाव येथे आणले जाणार आहे. मंगळवार, (२७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता नायगाव शहरातील हनुमान मंदिरच्या बाजूला अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबियाकडून देण्यात आली.
खासदार वंसत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
- जन्म - 15 ऑगस्ट 1954
- 1987 साली नायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच , 24 वर्ष सरपंच
- 1990 - जिल्हा परिषद सदस्य
- 2002 विधान परिषद सदस्य (राष्ट्रवादी
- 2009 - विधानसभा सदस्य - अपक्ष
- 2014 - विधानसभय सदस्य - काँगेस
- 2024 - लोकसभा सदस्य - काँगेस