मुंबई Nana Patole On MVA Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. तसंच महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपा संदर्भात बैठकांचं सत्र मुंबई येथे सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज (21 मार्च) महाविकास आघाडीची महत्वाची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. बैठकीत जागा वाटपावर आणि सांगली, भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या संदर्भात चर्चा झाली. तर बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जागा वाटप कधी होणार, यासंदर्भात माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीची बैठक : महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पार पडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रतिभा धानोरकर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख आणि सुनील भुसरा उपस्थिती होते. तर बैठकीसाठी वंचित कडून कोणीही प्रतिनिधी उपस्थित नसल्याचं पाहायला मिळालं.
दोन दिवसात होणार निर्णय : महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना नाना पटोले म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात आमची मित्र पक्षांसोबत चर्चा सुरू असून त्यांना कसं सहभागी करता येईल यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय दोन दिवसात होईल. तसंच सांगली, भिवंडी, नागपूर मतदारसंघातील जागांवर चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले.
नाना पटोलेंना उमेदवारी मिळणार? : लोकसभेची उमेदवारी नाना पटोले यांना मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहे , यासंदर्भात विचारण्यात आलं असता नाना पटोले म्हणाले की, जेव्हा पक्षाकडून अंतिम यादी जाहीर होईल, तेव्हा आपल्या सगळ्यांना उमेदवार कोण असेल ते कळेल. तर पुढं आपणास दिल्लीत जायची इच्छा आहे का? यावर बोलताना ते म्हणाले की, पक्षाच्या आदेशाचा पालन सर्वांनाच करावा लागतं, आणि आम्हीही तेच करणार, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- Lok Sabha Elections 2024: महाविकास आघाडीची बैठक संपली, अनंत गीते शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल
- MP Vinayak Raut : दोन दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच जागा जाहीर होतील - खासदार विनायक राऊत
- 'वंचित'चा काँग्रेसला सात जागांवर पाठिंब्याचा प्रस्ताव, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षावरून विश्वास उडाला; आंबेडकरांचं खर्गेंना पत्र