छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Nana Patole On Govenment : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर निशाणा साधला. तसंच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असेल? यावरही भाष्य केलंय. ते म्हणाले, "मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप पक्षाच्या प्रमुखांनी वक्तव्य केलेलं नाही. ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं काम करत असल्यानं मुख्यमंत्री पदाचं नंतर बघू."
महाराष्ट्रात प्रत्येकावर कर्ज : यावेळी सरकारवर टीका करत नाना पटोले म्हणाले की, "महाराष्ट्र सरकार नापास झालंय. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी खोटी आश्वासनं दिली. जुनी पेन्शन योजना, शाळांना अनुदान, पोलीस पाटील भरती याबाबत खोटी चित्र तयार करण्यात आली. त्यामुळंच युतीला जनतेनं पाठिंबा दिला. मात्र, आता त्यांना भीती निर्माण झाल्यामुळं एक महिना निवडणुका पुढं ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. तिजोरीत पैसे नसताना प्रत्येकावर कर्ज यांनी उभं केलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कर्जलादून महागाई वाढवत आहे. नवीन जन्मलेल्या बाळाच्या डोक्यावर देखील 70 हजार रुपयांचं कर्ज यांनी दिलंय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग आहे. वीस ते चाळीस वर्ष या रस्त्याची खात्री दिली असताना आताच त्याला तडे गेलेत."
आमच्या योजना यांनी आणल्या : " राज्यात आणल्या गेलेल्या योजना या आमच्या होत्या. कर्नाटकमध्ये या योजना सुरू करण्यात आल्या. त्याचा आधार घेऊन राज्यात या योजना आणल्या गेल्या. तुम्ही मतं दिली नाही तर योजना बंद होतील, असं अजित पवार म्हणाले. अखेर त्यांच्या पोटातलं ओठावर आलं. मात्र, आमचं सरकार आल्यावर या योजनांना अधिक पैसे देऊन पुढे नेऊ," असं आश्वासन नाना पटोले यांनी दिलं. पुढं ते म्हणाले की, "निराधार योजना आमचीच आहे. पण त्यासाठी यांनी पैसे दिलेच नाही. रक्षाबंधनाच्या अगोदर निराधर योजनेचे बाराशे रुपये आणि त्यात लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये एकत्र करून त्यात वरचे तीनशे रुपये देऊन फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्या लाडक्या बहिणीला वीज बिल कमी केलं पाहिजे. महागाई कमी केली पाहिजे. एकीकडून दीड हजार रुपये द्यायचे आणि दुसरीकडून वीज बिलच्या माध्यमातून पैसे वसूल केले जात आहेत. सर्वांना माहित आहे की निवडणूक आली की या योजना दिल्या जातात. हे जनतेला कळतंय", अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसकडं अधिक ओढा : "आम्ही आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहोत. नांदेडमध्ये एक हजारावर अर्ज विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या अनुषंगानं प्राप्त झालेत. आता काही खरं नाही असं अनेकजण म्हणाले. मात्र याच मराठवाड्यात आमचे तीन खासदार निवडून आले. त्यामुळं महाराष्ट्रात आम्ही काँग्रेस पुढं घेऊन जाऊ, असा लोकांना आमच्यावर विश्वास आहे," असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- "सत्तेत बसलेल्या लोकांनी अनेक पोपट..." नाना पटोलेंचा नाव न घेता नितेश राणेंना टोला - NANA PATOLE News
- गुंडगिरीला पाठबळ देणारं महायुती सरकार, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी महागाईच्या मुद्द्यांना प्राधान्य देणार- पटोले - Nana Patole
- "...तर नरेंद्र मोदींना घरी जावं लागेल" - नाना पटोले - Maharashtra Politics