मुंबई : आज राज्यात विजयादशमी अर्थात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे आज संध्याकाळी मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेना उबाठा गटाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर, तर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. मात्र, या मेळाव्यावर पावसाचं सावट असल्यानं नेत्यांची, कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी मैदानात चिखल आणि पाणी साचल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळं दसरा मेळाव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
तारेवरची कसरत करावी लागणार : मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं धुमशान घातलंय. तसंच आज (12 ऑक्टोबर) राज्यातील मुंबईसह अनेक भागात पावसाची जोरदार शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. या कारणानं आज मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुंबईतील शिवाजी पार्कवर परंपरेनुसार ठाकरे गटाचा अर्थात उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होत असून, या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आलीय. परंतु तिथल्या मैदानावर नजर टाकली असता मैदानात अनेक ठिकाणी चिखल आणि पाणी साचल्याचं दिसून येतंय. हीच परिस्थिती मुंबईतील आझाद मैदानातदेखील बघायला मिळत आहे. त्यामुळं नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
दोन्ही बाजूनं टीझर प्रकाशित : मुंबईत होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होत असल्यानं या दोन्ही मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे काय बोलतात याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. या मेळाव्यासाठी दोन्ही बाजूनं यापूर्वी टीझर प्रकाशित करण्यात आले होते. त्यामध्ये देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केलेत. अशातच मेळावा सुरू झाल्यानंतर पावसानं हजेरी लावली तर भर पावसात मेळावा पूर्ण करायचाच, असा चंगसुद्धा दोन्ही बाजूच्या नेत्यांनी बांधलाय.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा : राज्यात किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आद्रता वाढीस लागल्यानं पावसाची दाट शक्यता वर्तवली जातेय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, या कारणानं राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील तसंच मराठवाड्याच्या काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर अनेक ठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनसुद्धा हवामान विभागामार्फत करण्यात आलंय.
हेही वाचा -