मुंबई Lok Sabha Election 2024 : 19 एप्रिल पासून लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. असं असतानाही महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप रखडलेला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील लोकसभेच्या सहाच्या सहा जागा जिंकण्याचा निर्धार भाजपानं केला असताना, अजून त्यांना तीन जागांवर उमेदवार सापडत नाहीय. उत्तर पश्चिम मतदार संघातून विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासाठी भाजपाकडून मनधरणी केली जात आहे.
मुंबईतील 3 जागांवर अद्याप उमेदवार नाहीत : महाविकास आघाडीनं त्यांचा जागा वाटपाचा तिढा सोडवला आहे. दुसरीकडं महायुतीमध्ये अद्याप 10 जागांवर जागा वाटपावरून वाद सुरू आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या 3 जागांवर महायुतीला अद्याप उमेदवार ठरवता आला नाही. भाजपानं उत्तर मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. याप्रसंगी मुंबईतील सहाच्या सहा जागा महायुती जिंकेल असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.
भाजपाकडून योग्य उमेदवार सापडला नाही : अद्याप मुंबईतील 3 जागांवर उमेदवाराची घोषणा न झाल्यानं या जागांसाठी भाजपाकडून योग्य उमेदवार अजून सापडला जात नाही. दक्षिण मुंबई जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडं आहे. परंतु, या जागेवर भाजपाकडून मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तर या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट सुद्धा घेतल्याची चर्चा आहे. तर शिंदे गटाकडून भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. इथेही तालमेल बनत नसल्याकारणानं हा तिढा सुटत नाही.
अन्यथा आशिष शेलार पर्याय : उत्तर मध्य मुंबईत भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे. या मतदारसंघातून भाजपा योग्य उमेदवाराच्या शोधात असताना, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची वर्णी या मतदारसंघातून लागू शकते. विशेष म्हणजे आशिष शेलार हे निवडणूक लढण्यास इच्छुक नसून जर पक्षानं त्यांना जबाबदारी सोपवली तर त्यांच्याकडं दुसरा पर्याय नसणार आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून महाविकास आघाडीनं ही अद्याप उमेदवार घोषित केला नाही.
आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा : भाजपानं बुधवारी त्यांची लोकसभा उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली. परंतु, त्यामध्ये उत्तर मध्य मुंबई मतदार संघाचा समावेश केला नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष, आशिष शेलार यांनी मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांविषयी बोलताना सांगितलं की, यंदा महायुती मुंबईतील लोकसभेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार. त्या पद्धतीची रणनीती आखली गेली असून तयारीही सुरू झालीय. उत्तर मध्य मुंबई जागेविषयी त्यांच्या नावाची चर्चा असल्याबद्दल त्यांनी सांगितलं.
अमोल किर्तीकर यांच्या विरुद्ध कोण? : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे. अमोल कीर्तिकर हे विद्यमान खासदार, शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र आहेत. गजानन कीर्तिकर हे पुत्राच्या विरोधात निवडणूक लढू इच्छित नाहीत. या कारणानं या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्याकडून फिल्म अभिनेता, माजी खासदार गोविंदा अहुजा त्याचबरोबर शिंदे गटात प्रवेश केलेले आमदार रवींद्र वायकर यांची चाचपणी करण्यात आलीय. परंतु, हे दोन्ही उमेदवार या मतदारसंघासाठी योग्य नसल्याकारणानं आता येथून भाजपा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. या मतदारसंघात शिंदे उमेदवार देतात की, भाजपा त्यांच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा -