पुणे Lok Sabha Elections : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवारांच्या घरातच नणंद-भावजय यांच्यात लढत होत आहे. यामुळं या मतदारसंघाकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. "बारामतीची लोकसभा निवडणूक भाजपाला विकासासाठी नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी जिंकायची आहे. असं आम्ही नाही तर त्यांचे नेते हे बारामती पत्रकार परिषदेत बोलत आहेत," अशी बोचरी टीका खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केलीय.
मोठ्या वहिनींचा सन्मान राखला पाहिजे : "देशपातळीवर महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या शरदचंद्र पवार यांना संपवण्याचं षडयंत्र भारतीय जनता पक्षानं केलं आहे. त्यांना या निवडणुकीत सक्षम उमेदवार मिळत नसल्यानं त्यांनी पवार कुटुंबाचाच उमेदवार लोकसभा निवडणुकीत माझ्याविरोधात दिला आहे. मात्र माझ्या विरोधात उभा असलेला उमेदवार या नात्यानं माझ्या मोठया वहिनी असून, मोठ्या वहिनी या आमच्या संस्कृतीत आईसारख्या असतात. त्यामुळं प्रचार करत असताना माझ्या आईसारख्या मोठ्या वहिनींचा या निवडणुकीत सन्मान राखलाच गेला पाहिजे," अशी अपेक्षा देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलीय.
सुनेत्रा पवार यांना उमेदवारी : बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंच्या नावाची अगोदरच घोषणा झाली होती. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी प्रचारालाही सुरुवात केली होती. शरद पवार यांनीही त्याच अनुषंगानं विविध नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. तर पवार कुटुंबीयही या निवडणुकीत मैदानात उतरले. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. अखेर बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.
हे भाजपाचं षडयंत्र : आता लोकसभा निवडणुकीत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. "शरद पवार यांना संपवण्यासाठी भाजपाकडं कुठलाही उमेदवार नाही. म्हणून त्यांनी माझ्या वहिनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. हे भाजपाचं षडयंत्र आहे. हे केवळ शरद पवार यांना संपवण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे," असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होत्या.
ही वैचारिक लढाई : "माझ्यासाठी ही कौटुंबिक लढाई नाही. ही एक वैचारिक लढाई आहे. आपण सर्वांनी एक गोष्ट कटाक्षानं लक्षात घेतली पाहिजे. अनेक दिवस झाले भाजपा हा पक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक बैठका घेत आहे. त्यांचे नेते म्हणत आहेत की, या निवडणुकीत शरद पवार यांना संपवायचं आहे. त्यांना विकास करायचा नाही. त्यांना शरद पवार यांना संपवायचं आहे. त्यांचे नेते बारामतीत पत्रकार परिषदेत बोलले आहेत. त्यामुळं भाजपाचा हा विचार खोडून काढला पाहिजे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा -
- अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नणंद-भावजयांचा प्रचार सुरू; दोघींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास - Supriya vs Sunetra
- बारामतीत कोणाची दिसणार 'पॉवर'? आतापर्यंत एकहाती वर्चस्व राखलेल्या मतदारसंघात काका-पुतण्यामध्येच प्रतिष्ठेची लढाई - Baramati Lok Sabha Constituency
- पहिल्या टप्प्यात राज्यात नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 97 उमेदवार आजमावणार नशीब - Lok Sabha Elections