कोल्हापूर : विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच राज्यभर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यातच कोल्हापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी चक्क व्हीलचेअर, वॉकर घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी कोल्हापुरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नाकडं लक्ष वेधण्यासाठी या उमेदवारांनं अनोखी शक्कल लढवली. मनसेच्या या शलिदाराची चर्चा दिवसभर सुरू होती.
उमेदवारी अर्ज केला दाखल : कोल्हापुरातील अंतर्गत रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून 100 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. मात्र दिवाळी तोंडावर आली तरी रस्त्यांची खराब अवस्था पाहून सर्वसामान्य कोल्हापूरकर वैतागला आहे. निवडणुका असल्यानं जो तो पक्ष आपल्या जाहीरनाम्यात कोल्हापुरातील रस्त्यांचा प्रश्न आम्हीच मार्गी लावणार असं म्हणत आहे. मात्र, याच रस्त्याच्या प्रश्नासाठी आंदोलन उभारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराकडून आज अनोख्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
रस्त्याच्या प्रश्नाकडं वेधलं लक्ष : हातात वॉकर आणि व्हीलचेअर घेऊन तसेच कमरेचा आणि मानेचा पट्टा लावून मनसैनिक या अनोख्या संकल्पनेत सहभागी झाले होते. कोल्हापूर शहरातील वसंत-बहार रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत पायी चालत मनसैनिकांनी आणि उमेदवार अभिजीत राऊत यांनी रस्त्याच्या प्रश्नाकडं अनोख्या पद्धतीनं लक्ष वेधलं, याची चर्चा दिवसभर कोल्हापुरात सुरू होती.
जिल्ह्यात मनसे लढणार पाच जागा : कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर, शाहुवाडी पन्हाळा, राधानगरी, कागल आणि इचलकरंजी या पाच विधानसभा मतदारसंघात यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या चिन्हावर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मनसे नेहमीच रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळं विधानसभेसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना जनता नक्कीच विधानसभेत पाठवेल असा विश्वास, शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा -