मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचा पुण्यातील पोर्शे हीट अँड रन प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. मुंबईत सुनील तटकरे बोलत होते. पुण्यातील पोर्शे हीट अँड रन प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी नुकताच केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, सुनील टिंगरे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. याबाबत पोलिसांचा अहवाल आला असून, त्या अहवालामध्ये सुनील टिंगरे यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही पवार साहेब असं का बोलतात याबद्दल मला माहीत नाही, पवार साहेब हे देशाचे मोठे नेते आहेत, त्यामुळे ते काय बोलतात, यावर आपण बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
जागा वाटपात आमची चर्चा बरीच पुढे : विशेष म्हणजे महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा कुठे पोहोचली, याची आम्हाला माहिती नाही. परंतु महायुती म्हणून जागा वाटपात आमची चर्चा बरीच पुढे गेली आहे. आम्ही जागा वाटपासंदर्भात निर्णयाच्या जवळ आहोत, कोणाला कुठली जागा द्यायची याबाबत ठरलेले आहे. मात्र, योग्य वेळ येताच आपण ते जाहीर करू, असंही सुनील तटकरे म्हणालेत. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या पुढे निश्चित आहोत आणि पुढे राहणार, असा दावा सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना केला. तसेच नवाब मलिक यांना अणुशक्ती नगरची जागा देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र नवाब मलिक हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत आणि त्यांचा मुंबईतील काही मतदारसंघांवर चांगला प्रभाव आहे. अबू आझमी आता महाविकास आघाडीत आहेत की नाही हे दिसत नाही. त्यामुळे त्याबाबत काही बोलता येणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपाचा राष्ट्रवादीवर विश्वास : दरम्यान, अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजपाला फटका बसल्याचे अनेकदा भाजपाच्या नेत्यांकडून बोलले जात आहे. या संदर्भात विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, जर भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास नसता तर पेट्रोलियम आणि गॅस समितीच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली नसती. माझी नियुक्ती केल्यामुळे सिद्ध होते की, भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास आहे, असंही तटकरेंनी अधोरेखित केले.
हेही वाचा -