मुंबई Shivsena Controversy : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नऊ जागा तर शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं आता पुन्हा एकदा पक्षांतराची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना शिंदे गटातील काही आमदार शिवसेना उबाठा गटात प्रवेश करतील असा दावा पक्षाकडून केला जात असताना हा दावा खोटा असून उलट शिवसेना उबाठा गटातीलच अनेक नेते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक असल्याचा प्रति दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केलाय.
शिंदेंचे आमदार आमच्या संपर्कात : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे शिवसेनेचे आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे पाच ते सहा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच पक्षप्रवेश करतील असा दावा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हे चित्र राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटातील काही आमदार आपल्या पक्षाच्या संपर्कात आहेत, असं अहिर यांनी म्हटलंय.
ठाकरेंचे आमदार आमच्या संपर्कात : दरम्यान, या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी सांगितले की, या लोकसभा निवडणुकीत आम्ही सात जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जास्ती जागा लढवून केवळ नऊ जागांवर विजय मिळवला आहे. आमचा स्ट्राईक रेट 48% आहे तर उद्धव ठाकरे गटाचा स्ट्राइक रेट 43% आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यापेक्षा निश्चितच सरस आहोत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे असल्याने आता उलट शिवसेना उबाठा गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमच्या पक्षातील आमदार शिवसेना उबाठा गटात जाण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ अफवा पसरवून लक्ष वेधून घेण्याचा उबाठाचा प्रयत्न असल्याचा आरोपही वाघमारे यांनी यावेळी केला.
हेही वाचा :