चंद्रपूर MLA Kishor Jorgewar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, त्यांना बिनशर्त पाठिंबा देणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी स्थानिकांना 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी यासाठी आक्रमक जनआंदोलन उभारलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत याच प्रमुख मुद्यावर सर्वाधिक मताधिक्यानं ते निवडून आले होते. कायम सत्तेच्या सोबत राहणाऱ्या जोरगेवारांना ही मागणी पदरात पाडण्याच्या अनेक संधी होत्या. त्यासाठी ते ताठर भूमिका घेऊ शकले असते. मात्र, सत्तेची फळं चाखण्यात त्यांनीही धन्यता मानली. 200 युनिट मिळवून देण्यात जोरगेवार हे अपयशी ठरले असून शेवटच्या विधानसभा अधिवेशनानंतर ही आशा आता संपूर्णतः मावळलीय. त्यामुळं पाच वर्षानंतर 200 युनिट मोफत वीज मिळण्याचं जनतेचं स्वप्न हे आता स्वप्नच राहिलंय. तर विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असून अशावेळी या अपूर्ण आश्वासनाला घेऊनच जोरगेवार यांना मताचा जोगवा मागावा लागणार आहे.
200 युनिटचे जनआंदोलन : किशोर जोरगेवार हे चाणाक्ष राजकारणी असून राजकीय मुद्द्यांची त्यांना उत्तम जाण आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'यंग चांदा ब्रिगेड' या संघटनेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी स्थानिक युवकांना घेऊन संघटन उभारणी करत अनेक आंदोलनं केली. चंद्रपूर शहरात मोठमोठे उद्योग असून यातील सर्वात महत्त्वाचा उद्योग म्हणजे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र. दररोज 12006 उमेगावॉट इतकी वीजनिर्मिती येथून होते. मात्र, याची झळ प्रदुषण आणि इतर समस्यातून स्थानिकांना सोसावी लागते. अवजड वाहतूक, त्यातून होणारे अपघात, रस्त्यांची दुर्दशा, प्रदूषण, आरोग्याच्या समस्या अशा अनेकबाबी सहन कराव्या लागतात. त्यामुळं याची भरपाई म्हणून स्थानिकांना वीज बिलात 200 युनिट मोफत वीजेची सूट देण्यात यावी यासाठी जोरगेवार यांनी जन आंदोलन उभं केलं. यासाठी जनस्वाक्षरी मोहीम, वीज कार्यालयावर धडक मोर्चा, वीज बिलाची होळी, नेत्यांचा घेराव अशी अनेक आंदोलनं केलीत. या आंदोलनात त्यांना जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळाला.
राजकीय कोलांटउड्या आणि मतदारांत संभ्रम : जोरगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले असून त्यांची राजकीय कारकीर्द ही भाजपात असताना घडली. मात्र, 200 युनिटच्या आंदोलनामुळं आणि सर्वसमावेशक राजकीय आखणीमुळं काँग्रेसचा पारंपरिक मतदारवर्ग असलेल्या दलित आणि मुस्लिम वर्गानं जोरगेवर यांना भक्कम मतदान केलं. 2019 मध्ये भाजपाच्या अंतर्गत राजकारणात जोरगेवार यांना जिंकविण्यात भाजपाच्याच काही मोठ्या नेत्यांनी मदत केली होती. भाजपाच्या पारंपरिक मतदारांनी देखील जोरगेवार यांना मतं दिली. तब्बल 72 हजारच्या फरकांनी ते विजयी झाले. निवडून येताच आपली भूमिका स्पष्ट करण्यापूर्वीच त्यांनी त्वरित महायुतीच्या सरकारला पाठिंबा देत असल्याचं पत्र देवेंद्र फडणवीस यांना दिलं. यामुळं काँग्रेसचा पारंपरिक मतदारवर्ग नाराज झाला. पण राज्यात सत्ता महाविकास आघाडीची बसली आणि जोरगेवार तोंडघशी पडले. यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला आपलं समर्थन दिलं. असं करताना देखील त्यांनी 200 युनिटच्या अटीबाबत वाटाघाटी केली नाही. महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानं भाजपाचा पारंपरिक मतदार देखील दुरावला गेला. सत्तेची फळं चाखत असताना अचानक जोरगेवार एकनाथ शिंदे गटात गेले. गुवाहाटी येथे एकनाथ शिंदेच्या बंडात ते सामील झाले आणि त्यांनी महायुतीला आपलं समर्थन जाहीर केलं. यावेळी देखील त्यांनी 200 युनिटची मागणी लावून धरली नाही. त्यामुळं किशोर जोरगेवारांच्या राजकीय भूमिकेच्या कटीबद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
200 युनिटच्या गमावलेल्या संधी : महायुतीच्या सरकारमध्ये जोरगेवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय होऊन गेले. शिंदे चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी आवर्जून जोरगेवार यांच्या घराला भेट दिली आणि मनमोकळा संवाद साधला. मात्र, यावेळी 200 युनिटचे आश्वासन आणि त्यावर चर्चा त्यांनी केली नाही. लोकसभा निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून जोरगेवार यांनी भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा न देता ताठर भूमिका घेतली होती. शेवटी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना जोरगेवार यांची मनधरणी करावी लागली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ यांचा समावेश होता. जोरगेवार यांचा पाठिंबा मिळण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळ यांना जोरगेवार यांच्या निवासस्थानी जाऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली होती. तेव्हा कुठं जोरगेवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्यासाठी आपण मेळावा घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र, 200 युनिटबाबत त्यांनी कुठलेही आश्वासन पारड्यात पाडून घेतलं नाही किंवा या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली नाही. याचा राजकीय लाभ जोरगेवार यांना व्हायचा तो झाला. मात्र, जनतेच्या पदरी काहीच पडलं नाही.
पाठिंबा देऊनही पीछेहाट : जोरगेवार यांनी प्रचारतोफा थांबवण्याच्या ऐन आदल्या दिवशी मुनगंटीवार यांना पाठिंबा दिला. मात्र, तरीही मुनगंटीवार यांना 80 हजार 484 इतकीच मतं मिळाली. तर प्रतिभा धानोरकर यांना तब्बल 1 लाख 19 हजार 811 मतं पडली. हा निकाल जोरगेवारांना देखील आत्मचिंतनास भाग पाडणारा आहे. तर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा आणि आपण त्यात सहभागी झाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया जोरगेवार यांनी नुकतीच दिलीय.
200 युनिट ट्रोलिंग विरुद्ध तक्रार : जोरगेवार यांनी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. तर 200 युनिटच्या आश्वासनाला श्रद्धांजली देणारं बॅनर काँग्रेसचे प्रवीण पडवेकर शहरात लावलं होतं. मात्र, या विरोधात जोरगेवार यांच्या संघटनेकडून तक्रार करण्यात आलीय. एकूणच जोरगेवार यांच्या मागे 200 युनिटचं मोठं आव्हान असणार आहे. यावर ते आता कोणती राजकीय आखणी करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले जोरगेवार...
याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, "पाच वर्षे पूर्ण झाली असली तरी 200 युनिट मोफत मिळण्याची मागणी ही कायम असणार आहे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा देखील केला आहे. मात्र, 200 युनिट मोफत देण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. त्याचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली आहे, शेतकऱ्यांना वीज देण्याची योजना आहे. यामुळे तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. त्यामुळे याबाबत धोरणात्मक निर्णय घेतल्यावरच तोडगा निघू शकेल. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ हे आपल्या निवासस्थानी भेट घ्यायला आले होते. मात्र 200 युनिट मागणीसाठी ताठर भूमिका घेण्याची ती योग्य वेळ नव्हती. यासाठी सातत्याने पाठपुरावा करतो आहे. याचा लाभ सर्व जिल्ह्याला मिळणार आहे. मात्र दुर्दैवाने या मागणीला जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींची साथ मिळत नाही अशी खंत आहे."
हेही वाचा -