छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षातील बंडखोरी मोडून काढण्यात यश आल्याची माहिती, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली. निवडणुकीत सरकारने केलेल्या विकास कामाच्या जोरावर प्रचार करणार आहोत. 'लाडकी बहीण योजना आणि राज्यात आणलेले नवीन औद्योगिक प्रकल्प यांच्यामुळं चांगला जनाधार मिळेल आणि महायुती 180 जागांवर विजय मिळवत पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनोज जरांगेंचा प्रभाव लोकसभेत होता, भाजपा विषयी चुकीच्या अफवा पसरवल्या. मात्र, आता तो संभ्रम दूर झाल्यानं या निवडणुकीत विरोधात लोक नसल्यानं चांगला परिणाम होईल असं डॉ. कराड यांनी स्पष्ट केलं.
मराठवाड्यात भाजपा विरुद्ध भाजपा नाही : मराठवाड्यात भाजपा पक्षात झालेली बंडखोरी मोडून काढण्याची जबाबदारी डॉ. भागवत कराड यांच्यावर देण्यात आली होती. मागील पाच ते सहा दिवस प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उमेदवारांच्या अडचणी ऐकून घेणे, त्यांची समजूत काढण्याचं काम त्यांनी केलं. बीड जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये लक्ष केंद्रित करून बंडखोरांची समजूत काढली असल्यानं आता मराठवाड्यात भाजपा विरुद्ध भाजपा अशी लढाई नाही. मात्र, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या विरोधात दोन ते तीन ठिकाणी उमेदवार उभे आहेत. तर फुलंब्रीमध्ये भाजपा विरोधात शिंदेंचा बंडखोर मैदानात आहेत. अशा बोटावर मोजण्या इतक्या जागांवर अडचण आहे अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.
विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढणार : दिवाळी संपताच सर्वच राजकीय पक्षांनी आता प्रचाराला खरी सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये गेली अडीच वर्ष केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतं मागणार आहोत अशी माहिती, डॉ. कराड यांनी दिली. लाडकी बहीण योजनेत महिलांना सक्षम करण्याचं काम सरकारनं केलं. वर्षाला तीन सिलेंडर देण्यात आले तर राज्यात विशेषतः मराठवाड्यात नवीन औद्योगिक प्रकल्प आणले. अनेकांना रोजगार उपलब्ध देखील झाल्यानं नक्कीच सकारात्मक वातावरण असल्यानं महायुतीलाच मतदान मिळेल. 288 पैकी किमान 180 जागा जिंकण्याचा निर्धार असल्याचं डॉ. कराड यांनी सांगितलं.
लोकसभेतील प्रतिमा बदलली : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मोठा फटका भाजपाला बसला. विशेषतः जालना आणि बीड मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला. विधानसभा निवडणुकीत देखील मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा फटका बसणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र तसा परिणाम होणार नाही, आमची प्रतिमा खराब करण्यात आली होती. संविधान बदलणार अशी खोटी चर्चा घडवून आणली. आरक्षण विरोधात असल्याचं भासवलं मात्र आता तशी परिस्थिती नाही. मतदारांना आता सत्य कळलं असल्यानं विधानसभा निवडणुकीत विचारपूर्वक मतदान होईल असा विश्वास डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -