मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला तरी नवीन सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याची चर्चा आहे. आता खाते वाटपावरून महायुतीत बिघाडी बघायला मिळत आहे.
महायुतीची बैठक रद्द : राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालं असून केवळ घोषणा होणं बाकी आहे. परंतु खातेवाटपावरून महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचा संकेत देणारे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री पदासाठी हट्ट धरून बसले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही गृहमंत्री आणि अर्थमंत्री या दोन्ही खात्यासाठी हट्ट धरला आहे असं समजतय. परंतु भाजपानं कुठल्याही परिस्थितीमध्ये गृह मंत्रीपद हे स्वतःकडेच ठेवणार, असं ठामपणे सांगितल्यानं एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. या नाराजीमुळंच एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी गेल्यानं शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक रद्द करावी लागली.
गृह खात्यासाठी तेव्हा फडणवीस तर आता एकनाथ शिंदे : समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्री पदाची ऑफर देण्यात आली. जर एकनाथ शिंदे यांनी केंद्रात मंत्रीपद स्वीकारलं, तर राज्यातील उपमुख्यमंत्री पद हे शिवसेनेच्या अन्य कोणत्या तरी नेत्याला दिलं जाईल. परंतु एकनाथ शिंदे यांनी केंद्रातील मंत्रिपद नाकारलं असून गृहमंत्री पद मिळालं, तरच उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार, असा पवित्रा घेतला आहे. या विषयावर बोलताना शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं, अशा मताचे आम्ही आहोत. परंतु हे पद स्वीकारताना त्यांचा यथोचित सन्मानसुद्धा व्हायला हवा. याकरता गृहमंत्रीपद सुद्धा शिवसेनेला मिळायला हवं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गृहमंत्री पद हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. मग आता गृहमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असायला हवं."
चार माजी मंत्र्यांच्या नावाला विरोध : शिवसेनेचे तानाजी सावंत, दीपक केसरकर, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना नव्या मंत्रिमंडळात घेण्यास भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या चौघांच्याही कार्यपद्धतीमुळं भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याची माहिती आहे. याच कारणानं या चारही माजी मंत्र्यांचा पुन्हा नवीन मंत्रिमंडळात समावेश होऊ नये, याकरता एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाकडून प्रचंड दबाव आहे.
भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांची नावं
- देवेंद्र फडणवीस
- राधाकृष्ण विखे पाटील
- गिरीश महाजन
- पंकजा मुंडे
- गणेश नाईक
- चंद्रशेखर बावनकुळे
- रवींद्र चव्हाण
- मंगल प्रभात लोढा
- आशिष शेलार
- माधुरी मिसाळ
- संजय कुटे
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची नावं
- एकनाथ शिंदे
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- गुलाबराव पाटील
- तानाजी सावंत
- भरत गोगावले
- संजय शिरसाट
- प्रताप सरनाईक
- राजेश क्षीरसागर
- आशिष जयस्वाल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावं
- अजित पवार
- छगन भुजबळ
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- दिलीप वळसे पाटील
- अनिल पाटील
- धर्मरावबाबा आत्राम
- आदिती तटकरे
हेही वाचा