मुंबई MVA seat Sharing in Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली. विशेष म्हणजे, जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी असो की महायुती या दोन्ही आघाड्यांना लोकसभा निवडणुकीत वादाला सामोरं जावं लागलं. ज्याचा फटका विशेष करुन महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला. याकरता जागा वाटपावरुन वाद नको म्हणून महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांनी समसमान प्रत्येकी 96 जागा वाटून घ्याव्यात, असा एक नवीन प्रस्ताव समोर आलाय.
जागा वाटपात काँग्रेसचा पुढाकार : ऑक्टोंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणुकीत महायुती तसंच महाविकास आघाडी यांच्यामध्ये वाद दिसून आला. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी मध्यस्थीची भूमिका घेतल्यानं आघाडीत तशी जास्त बिघाडी दिसून आली नाही. तर महायुतीमध्ये भाजपानं शेवटपर्यंत जागा वाटपाच्या मुद्द्यावर ताणून धरल्यानं त्याचा फटका महायुतीला बसला. विधानसभा निवडणुकीत असं होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी समसमान प्रत्येकी 96 जागा वाटून घ्याव्या असा प्रस्ताव समोर आणला आहे. याकरता काँग्रेसनं पुढाकार घेतला असून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासोबत या फॉर्मुल्यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री : यंदाच्या लोकसभेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं 17 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 13 जागांवर त्यांचा विजय झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा फक्त एका जागेवर विजय झाला होता. यामुळं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वी केलं होतं. इतकंच नाही तर आगामी विधानसभेत काँग्रेस 150 जागा लढवणार असंही वक्तव्य त्यांनी केल्यानं यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी छोटा भाऊ मोठा भाऊ अशी भाषा चालू देणार नाही असा सज्जड दम नानांना भरला होता. नाना पटोलेंच्या वक्तव्याची गंभीर दखल काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडनं घेतल्यानंतर याबाबत नाना पटोले यांना तंबीही देण्यात आली आहे. आता राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना प्रत्येक पक्षाला 96 जागा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासोबत मुख्यमंत्री पदासाठी कोणाचंही नाव जाहीर न करता ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असंही ठरवण्यात आल्याचं बोललं जातंय.
सामोपचारानं जागा वाटपाचा तिढा सोडवावा : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काही जागांसाठी शेवटपर्यंत रस्सीखेच सुरु होती. हे चित्र पुन्हा विधानसभेत दिसू नये याची काळजी आता सर्वच पक्ष घेत आहेत. जेणेकरुन जागा वाटपाचा मुद्दा लवकर सोडवला गेला तर प्रचारालाही अधिक अवधी भेटेल व त्या कारणानं महायुतीवर आघाडी करण्यात महाविकास आघाडी सरस राहील. 2019 च्या विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं 56 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली व एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेले. आता जनतेनं शिवसेनेतील फुटी नंतर सुद्धा जो विश्वास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर दाखवला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देण्यासाठी जागा वाटपात जास्त रस्सीखेच न करता प्रत्येकानं दोन पावलं मागे घेत सामोपचारानं जागा वाटपाचा तिढा सोडवावा अशीच भूमिका महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी घेतली आहे.
हेही वाचा :
- लोकसभेच्या एका जागेवर भाजपा, शिंदेंनी दरोडा टाकला - संजय राऊत - Sanjay Raut
- नागपूर शहरातील सहा विधानसभा जागांवर काँग्रेसचा दावा; घटकपक्षांच्या हातात गाजर? - Maharashtra Assembly Election 2024
- भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' माहिती - BJP Core Committee Meeting