मुंबई : सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यावरुन नवा वाद सुरू झालाय. राष्ट्रवादी कॉंग्रसचे (शरदचंद्र पवार) माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटातर्फे बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार होती. परंतु, पोलीस प्रशासनाने मतदान झालं तर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर जानकर यांनी स्थानिकांशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा मुद्दा लावून धरल्याचं बघायला मिळतंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार हे देखील स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी मारकडवाडीत पोहोचलेत. यावरुनच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवार म्हणाले की, "आम्ही शरद पवारांचा सन्मान करतो. मात्र, त्यांनी या वयात असा खोटारडेपणा करावा, हे अयोग्य आहे. ईव्हीएम आणि मतदान प्रकरणी जनतेला कन्फ्युज करुन आपलं अपयश लपवायचं काम पवार करत आहेत. विधानसभेत त्यांचा प्रचंड मोठा पराभव झालाय. जनतेने त्यांना नाकारलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थेतदेखील त्यांना पराभवाची भीती असल्यानं डिपॉझिट वाचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तसंच मारकडवाडीत पवारांसोबत स्थानिक नागरिक नाहीत. त्यांचे कार्यकर्ते आहेत", असा आरोप बावनकुळे यांनी केला. तसंच मारकडवाडीतील यापूर्वीच्या मतदानाची आकडेवारी तपासण्याची गरज असल्याचंही बावनकुळे म्हणाले.
पवार, गांधींच्या नौटंकीला महाराष्ट्र कंटाळला : पुढं ते म्हणाले, "शरद पवार, राहुल गांधी यांच्या नौटंकीला महाराष्ट्र कंटाळलाय. संविधानाचा अपमान तेच करत आहेत. ईव्हीएमला एवढा विरोध असेल, तर लोकसभेत मविआच्या विजयी झालेल्या खासदारांनी राजीनामा द्यावा. विधानसभेत आता विजयी झाले त्यांनीदेखील राजीनामा द्यावा. अनेक निवडणुकीत आम्ही हरलो, त्यातून शिकून पुढे गेलो. विरोधकांनी देखील शिकावं", असा टोलावजासल्ला त्यांनी दिला.
हेही वाचा -