नागपूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 20 दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लोटलाय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर आज (14 डिसेंबर) अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून मंत्री पदाची माळ कुणा-कुणाच्या गळ्यात पडेल याबाबत अद्याप नावं समोर आली नाहीत.
उद्या मंत्रिमंडळ विस्तार : भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन पक्षांच्या महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या सत्तेत विराजमान आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तीनही पक्षात मंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागल्यानं कुणी आमदार नाराज होऊ नये, यासाठी रोजच्या रोज मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा मुहूर्त शोधला जात होता. सोमवारपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन भरवलं जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित आहे.
...पण मंत्रीपद कुणाला हे ठरेना : मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगानं मुंबईत तीनही पक्षाच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. वजनदार मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपानं देखील महत्त्वाच्या खात्यांवर दावा केलेला आहे. त्यामुळं भाजपा आणि शिवसेनेत मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळंच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय अशी चर्चा सुरू असतानाच रविवारी (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी दुपारी 3 वाजता होईल, असं सांगितलं जात आहे. मात्र, राजभवनाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, पण मंत्रीपद कुणाला द्यावं हे ठरेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
1991 ला नागपूरच्या राजभवनात झाला होता शपथविधी : 33 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 साली 5 मंत्र्यांनी नागपूरच्या राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी शिवसेनेत बंडाळी झाली होती. छगन भुजबळ यांच्यासह काहींनी नेत्यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांचा शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनात झाला होता. त्यानंतर आता फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपूरला होणार असल्यानं राजभवन चर्चेत आलं आहे.
हेही वाचा