पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. बारामतीत अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पवार कुटुंबातील फुटीवर जोरदार चर्चा रंगलीय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती येथील सभेदरम्यान भावनिक होत, घर कोणी फोडलं असा सवाल करत शरद पवारांवर निशाणा साधला. दरम्यान, शरद पवार यांनी बारामतीमधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
अजित पवाराची केली नक्कल : बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार यूगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. त्यावेळी शरद पवार येतील आणि भावनिक आवाहन करतील, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता ते भावनिक बोलत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. इतकंच नाही तर या वेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांची नक्कल देखील केली.
विचारधारेसाठी मी काम करणार : "आम्ही गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेतले आहे. मी याच विचारांनी काम करतो. गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण, ज्योतीराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या सर्वांची विचारधारा ही माझी विचारधारा आहे. या विचारधारेसाठी मी काम करणार. हीच माझी पद्धत आहे," असं शरद पवार यांनी सांगितलं.
एकही पद सुप्रिया सुळे यांना दिलं नाही : "घर मी फोडलं असं ते म्हणतात. ही गमतीची गोष्ट आहे. घर फोडायचं काहीही कारण नाही. घरात आजपर्यंत माझं ऐकत होते. मी कधीही त्यांच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट केली नाही, करणार ही नाही. इथून पुढं कोणीही कसलीही भूमिका घेतली, तरी मी चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही. कुटुंब एक राहील याची मी काळजी घेणार आहे आणि हा माझा स्वभाव आहे. मला दुसरं काहीही करायचं नाही. माझ्या हातात अनेक वर्ष राज्याची सत्ता होती, अनेक पदं मला देण्याचं अधिकार होता. मी अनेकांना मंत्री केलं, अनेकांना पद दिली पण एकही पद मी सुप्रिया सुळे यांना दिलं नाही आणि हेच करत असताना घर एकत्रित राहील पाहिजे, यापेक्षा दुसरा विचार कधीच आलेला नाही.", असं म्हणत शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा