मुंबई : भाजपाच्या कालिदास कोळंबकर यांनी दमदार विजय मिळवला. शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांचा पराभव झाला. वडाळ्यात मतमोजणीच्या अनेक फेऱया झाल्या आहेत. या मतदारसंघातून अखेर भाजपाचे कालिदास कोळंबकर हे विजयी झाले आहेत. कोळंबकर यांच्यासमोर शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांचं आव्हान होतं. त्या मुंबईच्या महापौर राहिल्या आहेत. कोळंबकर यांनी दणदणीत विजय मिळवला.
नऊवेळा कालिदास कोळंबकर आमदारपदी : वडाळा विधानसभा मतदारसंघ हा मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागातला महत्त्वाचा मतदारसंघ असून, आठवेळा आमदार राहिलेले कालिदास कोळंबकर यांना भाजपानं पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. वडाळा विधानसभेची जागा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाचे प्रमुख स्थान राहिले. वडाळ्याचा परिसर पश्चिमेला दादर, वायव्येला माटुंगा आणि दक्षिणेला शिवडी या भागांनी वेढलेला आहे.
नाव गिनीज बुकमध्ये जाईल : विधानसभा निवडणुकीत सलग नऊवेळा कोळंबकर हे विजयी झाले आहेत. शिवसेना, काँग्रेस, भाजपा असा राजकीय प्रवास करणाऱ्या कोळंबकर यांनी १९९० पासून सातत्यानं निवडणूक जिंकली आहे. त्यांनी सलग नऊ निवडणुका जिंकलेल्या आहेत. विशेष म्हणजे, कोळंबकर यांनी प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध केला होता. मतदारसंघातील मुस्लिम मतदार आपल्या पाठिशी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. सलग नवव्यांदा निवडणूक जिंकून माझं नाव गिनीज बुकमध्ये जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
कोळंबकर नारायण राणेंचे कट्टर समर्थक : कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. जिथे जिथे नारायण राणेंनी पक्ष बदलून जातात, तिथे कोळंबकरांनीही त्यांच्याबरोबर पक्ष बदललाय. 1990 ते 2004 या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृह राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. 2019 पर्यंत सतत निवडणुका जिंकत आलेत.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा जाधव होत्या रिंगणात : वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर श्रद्धा जाधव आणि मनसेकडून माजी नगरसेविका स्नेहल जाधव निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
हेही वाचा - "मोदी, शाह, फडणवीस, शिंदेंनी लावून घेतलेले निकाल आम्हाला मान्य नाहीत"; संजय राऊत कडाडले