अमरावती : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक रणधुमाळी सुरू झालीय. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दोन आघाड्या समोरासमोर आहेत. प्रामाणिक मूल्यांच्या आणि मुद्यांच्या आधारे महायुतीनं विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडला आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडी आहे. या आघाडीला संत-महापुरुषांच्या विचारांशी घेणं-देणं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित निश्चितच राष्ट्रहित जपणाऱ्या महायुतीचा विजय होईल, असा विश्वास भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. ते तिवसा विधानसभा मतदारसंघात गुरुकुंज मोझरी येथील आयोजित सभेत बोलत होते.
राजेश वानखडे यांच्या प्रचारासाठी सभा : तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपाचे उमेदवार राजेश वानखडे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची बुधवारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. राजेश वानखडे यांच्यासह धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे उमेदवार प्रताप अडसड, वरुड मतदारसंघातील भाजपा उमेदवार उमेश यावलकर, अचलपूरचे भाजपा उमेदवार प्रवीण तायडे आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार केवलराम काळे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ आज गुरुकुंज मोझरी येथे आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केल्यावर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं.
काँग्रेसनं हिंदूंना विभाजित केलं : "काँग्रेसनं सातत्यानं हिंदूंना विभाजित करून ठेवलं. मात्र आता आम्ही एक आहोत, असा संदेश सर्वत्र जायला हवा." असं योगी आदित्यनाथ म्हणालेत. तसंच यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. "काँग्रेस पक्षाकडून तर अपेक्षाच ठेवू नये. महाराष्ट्रात महाविकास आघाडी नव्हे तर, महाअनाडी आघाडी आहे," असं ते म्हणाले.
राष्ट्रधर्माशिवाय दुसरा धर्म नाही : आतापर्यंत हिंदूंना विभक्त करण्याचं धोरण काँग्रेसनं अवलंबलं. आता मात्र राष्ट्रधर्माशिवाय इतर कुठलाही धर्म या देशात श्रेष्ठ नसेल. आज भारत-चीन सीमेवर चिनी सैन्यानं माघार घेतली. मात्र, भारतीय सैन्य सीमेवर सज्ज आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी अतिशय गर्वाची असल्याचं देखील योगी आदित्यनाथ म्हणाले. "काँग्रेसला सत्ता केवळ स्वतःची तिजोरी भरण्यासाठी हवी आहे. मात्र आम्ही अगदी सर्वसामान्य कुटुंबाच्या विकासाचा विचार करतो, यामुळं जनतेनं भाजपासोबत राहावं," असं आवाहन देखील योगी आदित्यनाथ यांनी केलं.
हेही वाचा