छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी जाहीर सभेत बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? : यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मागील दहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ थापा मारत आहेत. थापा मारुन ते थकतच नाही. त्यांच्याकडं अशी कुठली दैवी शक्ती आहे? 'बटेंगे तो कटेंगे' ही त्यांची खरी घोषणा नाही, तर 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो को बाटेंगे', हीच त्यांची घोषणा आहे. राज्यातील देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ हे सगळे मिळून खाऊ असं धोरण राबवत आहेत", अशी टीका ठाकरेंनी केली.
...हे मोदी-शाहांना दाखवून द्या : "महाराष्ट्र मोदी-शाह यांच्या हातात द्यायचा की आपल्या हातात ठेवायचा, हे तुम्ही ठरवायचंय. महाराष्ट्र आपल्या हातात ठेवण्यासाठी मविआच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी आहे", असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. "महाराष्ट्रात वाघाचे छावे जन्माला येतात, हे मोदी-शाह यांच्यासह त्यांच्या चेल्याचपाट्यांना दाखवून द्या," असं आवाहन ठाकरेंनी केलं. "वाघ नखं आणली म्हणतात. मात्र, जर आमच्या वाट्याला जाल, तर माझ्या सोबतची वाघनखं (उमेदवारांकडं हात करुन) या महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी भाजपाला दिला.
नामांतर केलं आता पुढं काय? : "छत्रपती संभाजीनगर हे नामांतर केल्याचं ते सांगताय. या सर्वाचं श्रेय त्या दाढीवाल्याला दिलं जातंय. मात्र, चिकलठाणा विमानतळ आणि मतदारसंघाचे नाव अजूनही औरंगाबाद कसे? छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं तुमचं प्रेम खोटं आहे का?", असा सवाल ठाकरेंनी केला. "लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचंही नाव औरंगाबाद आहे. निवडणूक आयोग अजूनही नाव बदलण्यास तयार नाही. मग नाव बदललं गेलंय कुठं? औरंगाबादचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण केल्याचं सांगितलं जातंय. मात्र, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाण्याचं नव्हतं. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविण्याचं नव्हतं," अशी टीका देखील ठाकरे यांनी केली.
हेही वाचा -
- VIDEO : उद्धव ठाकरे यांची औसामध्ये पुन्हा एकदा तपासली बॅग; म्हणाले, "या, लाजू नका..."
- बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंनी काढला व्हिडिओ, म्हणाले,"मोदींची बॅग..."
- "राहुल गांधींच्या तोंडून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे..."; पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, 'एक है तो सेफ है'चा दिला नारा