पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामला सुरुवात झाली असून सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर झाले आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तसंच नाराज नेत्यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ असून या 21 मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांबरोबरच बंड केलेल्या उमेदवारांनी देखील काल शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला आहे.
'या' मतदारसंघात 99 उमेदवार : 4 नोव्हेंबरनंतर कोणता उमेदवार कोणाच्या विरोधात असेल, हे स्पष्ट होईल. पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघात तब्बल 1272 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 99 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार : पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीची माहिती घेतली, तर जुन्नर विधानसभा मतदारसंघात 43, आंबेगाव मतदारसंघात 51, खेड आळंदी मतदारसंघात 46, शिरूर मतदारसंघात 55, दौंड मतदारसंघात 52, इंदापूर मतदारसंघात 61, बारामती मतदारसंघात 73, पुरंदर मतदारसंघात 57, भोर मतदारसंघात 47, मावळ मतदारसंघात 42, चिंचवड मतदारसंघात 80, पिंपरी मतदारसंघात 99, भोसरी मतदारसंघात 55, वडगाव शेरी मतदारसंघात 56, शिवाजीनगर मतदारसंघात 65, कोथरूड मतदारसंघात 48, खडकवासला मतदारसंघात 91, पर्वती मतदारसंघात 47, हडपसर मतदारसंघात 86, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात 76 आणि कसबा मतदारसंघात 42 उमेदवारांनी असे एकूण 1272 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
आघाडी, युती असतानाही उमेदवारांची संख्या जास्त : प्रमुख राजकीय पक्षांची माहिती घेतली तर भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष असे छोटे पक्ष तसंच विविध संस्था संघटनेच्या वतीनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे राज्यात महायुती विरुद्ध महाविकास अशी युती आणि आघाडी झालेली असताना देखील पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात उमेदवारांची संख्या ही तब्बल 1272 असून येत्या 4 तारखेनंतर कोण माघार घेणार? आणि कोणा कोणात लढाई होणार? याचं चित्र स्पष्ट होईल.
हेही वाचा