कोल्हापूर : राज्यभरात आज मतदान होत असताना कोल्हापुरातील दोन ठिकाणी काँग्रेस आमदार सतेज पाटील समर्थक विरुद्ध महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचं समोर आलं. कार्यकर्त्यांना उद्देशून बघून घेण्याची भाषा करणाऱ्या क्षीरसागर समर्थकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कसबा बावड्यातील सतेज पाटील समर्थकांनी भगव्या चौकात एकत्र येत महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा निषेध केला. घटनास्थळी काँग्रेस आमदार सतेज पाटील दाखल झाले, त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं.
पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन : कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलावाचं सुशोभीकरण केलेला व्हिडिओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी राहुल माळी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता, असा आरोप करून महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर गटाकडून या व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आला. यानंतर कसबा बावड्यातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या माळी या पदाधिकाऱ्याला राजेश क्षीरसागर समर्थकांकडून धमकावल्याचा आरोप माळी यांनी केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही वेळात कसबा बावड्यातील आमदार सतेज पाटील समर्थक भगव्या चौकात एकत्र जमले. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या गटाकडून झालेल्या कृतीचा निषेध केला. तसंच कसबा बावड्यातील महाविकास आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला दादागिरीची भाषा केली, तर खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यानं दिला. घडलेला प्रकार समजल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील भगव्या चौकात दाखल झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली : मतदानाच्या दिवशी झालेल्या या प्रकारानंतर आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "कसबा बावडा येथील शांतता कोणी भंग करण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे खपवून घेणार नाही, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं कोल्हापूर सारख्या शांतताप्रिय शहरात असे प्रकार होत आहेत," असं आमदार सतेज पाटील म्हणाले.
हेही वाचा