अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणा यांचा पराभव करण्यासाठी प्रीती बंड या सक्षम उमेदवार मानल्या जात होत्या. मात्र, असं असतानाच बुधवारी (23 ऑक्टोबर) शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं बडनेराच्या जागेसाठी पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचं नाव जाहीर केलं. त्यामुळं प्रीती बंड यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. "मला अगोदर कामाला लागा असं सांगितलं. यामुळं मी गत अनेक दिवसांपासून पदयात्रा आणि मतदारांच्या भेटी सुरू केल्या होत्या. मात्र, आता ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतलाय, त्यानंतर कोणाशी काय बोलावं हे सुचतच नाही", अशी प्रतिक्रिया प्रीती बंड यांनी दिलीय.
प्रीती बंड समर्थकांची गर्दी : शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं बुधवारी बडनेरा विधानसभा मतदार संघातून सुनील खराटे यांचं नाव जाहीर होताच, प्रीती बंड यांचे शेकडो समर्थक सायंकाळी त्यांच्या रुक्मिणी नगर परिसरातील निवासस्थानी पोहोचले. पक्षश्रेष्ठींवरील नाराजीमुळं बंड यांच्या घरी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. तसंच पक्षानं हा चुकीचा निर्णय घेतलाय. रवी राणा यांना पराभूत करण्यासाठी प्रीती बंड यांना सक्षम उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र, त्यांना उमेदवारी न देणं हा शिवसैनिकांवर अन्याय असून आमदार राणांच्या विरुद्ध आता डमी उमेदवार दिल्याचा आरोप प्रीती बंड यांच्या समर्थकांकडून केला जातोय.
प्रीती बंड झाल्या भावूक : "गत 40 वर्षांपासून बंड कुटुंबीय शिवसेनेसोबत (ठाकरे गट) एकनिष्ठ आहेत. आमच्याकडं पैसे नसल्यामुळं सर्व शिवसैनिकांनी आपण पैसे गोळा करू आणि माझ्यासाठी निवडणूक लढवू असं ठरवलं. त्या दिशेनं सगळे कामाला देखील लागले होते. मात्र, असं अचानक कसं काय झालं हे कळायला मार्गच नाही", असं म्हणत प्रीती बंड भावूक झाल्या. तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिक आहोत. पण आता नेमकं काय करायचं हे या क्षणी सुचत नाहीये. याबाबत एक-दोन दिवसात शांततेनं विचार करू, असं देखील बंड म्हणाल्या.
समर्थकांनी व्यक्त केला रोष : पक्षश्रेष्ठींकडून चुकून हे नाव आलं असावं ही चूक कदाचित दुरुस्त होईल, अशी आशा काही शिवसैनिकांनी व्यक्त केली. तर काहींनी मात्र सुनील खराटे हे पाच ते सात वर्षांपूर्वी शिवसेनेत आले, त्यांना थेट जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली. मात्र, ते आपली जबाबदारी कधीही पार पाडू शकले नाहीत. कुठलं आंदोलन त्यांनी केलं नाही, आनंदराव अडसूळ यांनी त्यांना थेट पद दिलं मात्र त्यांचा मतदारसंघात कोणाशीही संपर्क नाही, अशी खंत देखील काही शिवसैनिकांनी व्यक्त केली.
कोण आहेत प्रीती बंड? : प्रीती बंड या दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी आहेत. संजय बंड हे 1996 मध्ये पहिल्यांदाच वलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2001 आणि 2005 च्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. 2009 मध्ये तिवसा विधानसभा मतदार संघ आणि 2014 मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघात संजय बंड हे पराभूत झाले. 2018 मध्ये संजय बंड यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी प्रीती बंड यांना 2019 मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं उमेदवारी दिली. या निवडणुकीत प्रीती बंड यांचा रवी राणा यांनी पराभव केला. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणा यांना पराभूत करण्यासाठी प्रीती बंड यांना सक्षम उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं.
हेही वाचा -