कोल्हापूर : भाजपा खासदार धनंजय महाडिक यांना जाहीर सभेत वादग्रस्त विधान करणं महागात पडलं. सभेत बोलताना त्यांनी 'लाडकी बहीण योजने'संदर्भात महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं, असा आरोप विरोधकांनी केला. यानंतर विरोधकांनी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात आता निवडणूक आयोगानं धनंजय महाडिक यांना नोटीस धाडली आहे.
निवडणूक आयोगाची नोटीस : धनंजय महाडिक यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी निवडणूक आयोगानं भारतीय न्यायसंहिता कलम 179 अंतर्गत आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं नोटीस बजावली आहे.
भाजपाचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक आहे. महिलांना दमदाटी करण्याचा प्रकार भाजपाचा लोकशाही व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे सिद्ध करण्यास पुरेसा आहे. भाजपा नेत्याचे हे विधान लोकशाही आणि संविधानाच्या विरोधातील आहे. कोणत्या… pic.twitter.com/sZkG1kPxTx
— Supriya Sule (@supriya_sule) November 9, 2024
धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले होते? : "लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत किंवा सभेत दिसल्या, तर त्यांचे फोटो काढा. ते फोटो आम्हाला पाठवा, म्हणजे आम्ही त्यांची व्यवस्था करू," असं विधान खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
आम्ही खपवून घेणार नाही : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "भाजपाचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक आहे. महिलांना दमदाटी करण्याचा प्रकार हा भाजपाचा लोकशाही व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हे सिद्ध करण्यास पुरेसा आहे. भाजपा नेत्याचे हे विधान लोकशाही आणि संविधानाच्या विरोधातील आहे. कोणत्या पक्षाच्या रॅलीत नागरिकांनी सहभागी व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. यासाठी कुणीही कुणावर दबाव टाकू शकत नाही. महिला आयोगानं त्यांच्यावर गंभीर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.
मी बिनशर्त माफी मागतो : "माझ्या वक्तव्यानं कुठल्याही माता भगिनीचं मन दुखावलं असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझं हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हतं. 'लाडकी बहीण योजना' ही राज्यातील एक लोकप्रिय योजना आहे आणि ती निवडणुकीत गेम चेंजर ठरेल. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला," असं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलं.
हेही वाचा