मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना राज्याबाहेरील प्रमुख नेते महाराष्ट्रात येऊन एकमेकांवर आरोपांची चिखलफेक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभेमध्ये हिमाचल प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक या राज्यातील सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, आता काँग्रेसनंही पंतप्रधान मोदींच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देण्यासाठी राज्याबाहेरील आपल्या नेत्यांना महाराष्ट्रात आणलं आहे. हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुंबईतील काँग्रेसचं मुख्यालय टिळक भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे.
आमच्या प्रगतीचं मोदींना दुःख : पंतप्रधान मोदी वारंवार खोटं बोलत असून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम भाजापावाले करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी काँग्रेसशासीत राज्यांचे प्रमुख नेते मुंबईतील काँग्रेस टिळक भवनात एकत्र आले. याप्रसंगी बोलताना हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू म्हणाले, " 'बटेंगे तो कटेंगे' असं बोलणं फार वाईट आहे. या देशाची संस्कृती या देशाला एकत्र ठेवते. 'बटेंगे तो कटेंगे' असं जर कोणी बोलत असेल, तर ते देशाला एकत्र ठेवू शकत नाहीत. आमच्या गॅरंटीबाबत बोलायचं, तर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली. यामुळं ज्यांना पूर्वी 5 हजार मिळायचे, ते आता 50 हजार मिळत आहेत. आम्ही दिलेल्या प्रत्येक गॅरंटीवर भर देत आहोत."
महाराष्ट्राच्या जनतेनं विचार करावा : "18 वर्षांवरील मुलीला 1500 रुपये. विधवा महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलते. हिमाचलची जनता आमची वाह वा करते, परंतु मोदींना याचं दुःख आहे. आम्ही व्यवस्थापन व्यवस्थित करण्यासाठी सत्तेत आहोत. ज्याच्या हाती सत्ता दिली त्यांनी काय केलं? लोकतंत्र जनतेचा आवाज आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं याचा विचार करावा," असं आवाहन सुखविंदर सुक्खू यांनी केलं.
एकनाथ शिंदे, अजित पवारांकडे भरपूर पैसे : याप्रसंगी बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाविषयी खोटं बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळं मी आज इथं येऊन सत्य मांडत आहे. शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रनंतर तेलंगणात होत होत्या. आम्ही शेतकऱ्यांसाठी 25 दिवसात 17 हजार 869 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. 10 महिन्यात आम्ही 50 हजार युवकांना सरकारी नोकऱ्या दिल्या. महालक्ष्मी योजनेअंतर्गत 49 लाख कुटुंबांना 500 रुपयात सिलेंडर, 200 युनिट पर्यंत वीज माफ केली, याचा फायदा 50 लाख कुटुंबांनी घेतला. महिलांसाठी बसमध्ये मोफत प्रवास, जाती निहाय जनगणना आम्ही सुरू केली आहे. महाराष्ट्रात बोलण्यासाठी मोदींकडे काही नाही, म्हणून ते इतर राज्यांवर बोलत आहेत. आम्ही लहानपणी महाराष्ट्र ही वीरांची धरती आहे, असं ऐकत आलो. पण आज या धरतीवर एकनाथ शिंदे, अजित पवार सारखे गद्दार आहेत. हा सक्षम महाराष्ट्र आज चुकीच्या लोकांच्या हातात गेला आहे. भारतीय जनता पक्ष हा भारतीय लबाड पक्ष आहे."
देवेंद्र फडणवीस आमदार राहतील की नाही? अशी शंका : महालक्ष्मी योजनेंतर्गत राज्यातील महिलांना आम्ही वर्षाला 4 हजार करोड देतो. अशा पद्धतीनं 5 वर्षात आम्ही 20 हजार करोड देणार आहोत. मोदी म्हणतात, इतके पैसे कुठून आणणार? मी त्यांना सांगतो अदानी-अंबानींसाठी तुम्ही 12 लाख करोड माफ केले. तेव्हा तुम्हाला कोणी विचारलं का की इतके पैसे कुठून आणले? असा सवाल रेवंत रेड्डी यांनी केला. "महाराष्ट्रात सुद्धा एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे पैसे वापरले तर महिलांना 3 हजार रुपये महिना देणं शक्य आहे," असा टोलाही रेवंत रेड्डी यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते, नंतर ते उपमुख्यमंत्री झाले. आता ते आमदार राहतील की नाही?" अशी शंकाही रेवंत रेड्डी यांनी उपस्थित केली.
कर्नाटकमध्ये येऊन राज्याचा विकास पाहा : "भाजपा आणि त्यांची महायुतीचे आभार मानतो की, त्यांनी आम्हाला सत्य समोर मांडण्याची संधी दिली. मी महायुतीच्या नेत्यांना कर्नाटकमध्ये येण्याचं आग्रहाचं आमंत्रण देतो. त्यांच्यासाठी 33 व्होल्व्हो बसची सोय मी करून देतो. जेव्हा आम्ही विरोधात होतो तेव्हाच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या परिस्थितीत किती बदल झालाय, ते महायुतीच्या नेत्यांनी कर्नाटकमध्ये येऊन प्रत्यक्ष बघावं. आमची पहिली गॅरंटी गृहज्योती योजना ही होती. आम्ही जनतेला 200 युनिट वीज मोफत दिली आहे. 10 किलो तांदूळ मोफत देत आहे. गृहलक्ष्मी योजना आम्ही आणली. प्रत्येक महिलेला महिन्याला 2 हजार रुपये दिले जात आहेत. महिलांना बसमध्ये मोफत प्रवास दिला. युवकांसाठी गॅरंटी योजना शक्ती स्कीमद्वारे महिन्याला 3 हजार रुपये आम्ही देत आहोत. राज्यात 1 करोड 22 लाख महिला गृहलक्षी योजनेचा लाभ घेत आहेत. भाजपा आमच्या योजना कॉपी पेस्ट करत आहे. आमचं जीडीपी 10.2 टक्क्यांवर गेलं आहे. म्हणून केवळ बाता मारणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना आमच्या राज्याचा विकास पाहण्यासाठी मी पुन्हा आमंत्रित करतो," असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले.
हेही वाचा
- "...म्हणून योगींना महाराष्ट्रात आणलं"; 'बटेंगे तो कटेंगे'वरून शरद पवारांचा घणाघात, अशोक चव्हाणांवरही साधला निशाणा
- "भाऊसाहेब कांबळेंनी विश्वासघात केला, त्यांनी बॅनरवर माझे फोटो...", विखे पाटलांचा हल्लाबोल
- राज ठाकरेंकडं फडणवीसांची स्क्रिप्ट; ईडीची टांगती तलवार असल्यानं त्यांना बोलावं लागते, संजय राऊतांचा हल्लाबोल