मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एक नव्हे, तर दोन उमेदवारी अर्ज दाखल करून नवाब मलिक हे मानखुर्द - शिवाजीनगर मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. परंतु भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्या प्रचारास पूर्णपणे नकार दिला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्यानं भाजपानं नाराजी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्यानं भाजपा सातत्यानं त्यांना महायुतीतून दूर करण्याचा प्रयत्न करत असतानाही नवाब मलिक यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मानखुर्द -शिवाजीनगरमधून तर त्यांची मुलगी सना मलिक हिला अणुशक्ती नगरमधून उमेदवारी देऊन एकप्रकारे भाजपाला डिवचलं आहे.
नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही : "भाजपाची भूमिका ही सुरुवातीपासून स्पष्ट राहिली आहे. महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी आपापले उमेदवार आपणच ठरवायचे आहेत. परंतु विषय फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांना दिलेल्या उमेदवारीबाबत आहे. यासंदर्भात भाजपाची भूमिका यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मीही वारंवार स्पष्ट केली आहे. आता पुन्हा एकदा सांगतोय, भाजपा कुठल्याही परिस्थितीमध्ये नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. आमची भूमिका ही नेहमी दाऊद आणि दाऊदशी संबंधित केससंदर्भातील व्यक्तीच्या प्रचाराची नाही," असं मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा विरोध : देवेंद्र फडवणीस यांनी केलेल्या आरोपांवरून नवाब मलिक यांना तुरुंगात जावं लागलं होतं. नवाब मलिक जेव्हा तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले होते. तेव्हा मलिक यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता. तेव्हापासून नवाब मलिक यांच्याबाबत अजित पवार गटात संभ्रमाची परिस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं अणुशक्ती नगरमधून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक हिला उमेदवारी जाहीर केली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांचा पत्ता कट करेल, अशी अपेक्षा होती. परंतु सना मलिक यांनी त्यादरम्यान वडील निवडणूक लढवणार, असं ठामपणे सांगितलं होतं. त्याप्रमाणे नवाब मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या ए बी फॉर्मवर अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या कारणानं भाजपा नेते नाराज झाले आहेत.
सना मलिक यांच्या प्रचाराबाबत संभ्रम? : नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अजित पवार गटाकडून अणुशक्ती नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या प्रचारावर बंदी घातल्याप्रमाणे सना मलिक यांच्या प्रचारावरही भाजप बंदी घालणार का? असा प्रश्न आशिष शेलार यांना उपस्थित केला असता ते म्हणाले की, "सना मलिक यांच्या संदर्भात कोणताही पुरावा किंवा माहिती समोर आली नाही, तोपर्यंत महायुतीचा उमेदवार हाच भाजपचा उमेदवार आहे, याबाबत दुसरा प्रश्न उपस्थितच होत नाही,"
हेही वाचा