कोल्हापूर : महाराष्ट्रात प्रचारसभेला जोरदार सुरुवात झालीय. त्यामुळं सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली सभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
महायुतीवर टीका : महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. "आमचं सरकार आलं की, जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार, सरकार पण स्थिर आणि भाव पण स्थिर होणार. मराठी आणि गुजरात असा वाद कधी होऊ देणार नाही, आमच्या राज्याचा घास लुबाडणार असाल तर ते होऊ देणार नाही, अडीच वर्षात माझं काय चुकलं?" असा सवाल करत ठाकरेंनी महायुतीवर तोफ डागली.
मोदी-शाह यांना इशारा : यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना इशारा दिला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी पुढचे 15 दिवस महाराष्ट्रात राहून येथील जनतेचा राग अनुभवायला हवा. हा छत्रपतींचा महाराष्ट्र तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
महाराष्ट्राशी गद्दारी : "राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत, शिवभोजन थाळी, नंबर वन राज्य बनवलं होतं. महाराष्ट्रातील एकही उद्योग बाहेर जाऊ देत नव्हतो, एवढा दरारा आमचा होता. म्हणून यांनी आमचं सरकार पाडलं. ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे," असं उध्दव ठाकरे म्हणाले.
मशाल पेटणार खोकेवाले भस्म होणार : "उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी आल्यावर आमचा जाहीरनामा जाहीर करू. या जाहीरनाम्यात मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार. महिला पोलिसांची भरती करणार, स्वतंत्र महिला पोलीस स्टेशन उभी करणार, आमचं सरकार आल्यावर मुंबईत परवडेल अशी घरे देणार. मुंबई रक्त सांडून मिळवली आहे. मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही. गद्दाराला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बसवलं. देवा भाऊ, जॅकेट भाऊ आणि दाढी भाऊ, तुमचा हे काही भाऊबिऊ नाही. हे सर्व खाऊ भाऊ आहेत. मशाल पेटणार खोकेवाले भस्म होणार," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.
अदानीच्या बगलबच्चांना गाडण्यासाठी सज्ज व्हा : प्रचारसभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार प्रकाश अबिटकर यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. "आमदार प्रकाश अबिटकर हे अदानींचे बगलबच्चे आहेत, त्यांना गाडण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहन त्यांनी राधानगरी-भुदरगड तालुक्यातील मतदारांना केलं.
हेही वाचा