मुंबई : एकीकडे महायुती व महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीचं जागावाटप शेवटच्या टप्प्यात आल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीतील छोट्या घटक पक्षांना जागावाटपात महत्त्वपूर्ण स्थान मिळत नसल्याची तक्रार घटकपक्षांमधून केली जात आहे.
महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख पक्षांसहित रामदास आठवलेंच्या अध्यक्षतेखालील रिपब्लिकन पक्षाचा समावेश आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, ज्योती मेटे यांच्या नेतृत्वाखालील शिवसंग्राम, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ति पक्ष महायुतीसोबत होते. मात्र, या पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचं जाहीर केलंय. महाविकास आघाडीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना (ठाकरे गट) या प्रमुख पक्षांसोबत शेकाप, डावे पक्ष, समाजवादी पक्षासहित इतर पक्षांचा समावेश आहे. समाजवादी पक्षानं देखील राज्यातील चार जागांवर उमेदवार जाहीर केलेत. महाविकास आघाडी असो की महायुती असो त्यांच्या प्रमुख पक्षांमधील जागावाटपाची चर्चा अद्याप अंतिम निर्णयाप्रत आलेली नसल्यानं त्यांच्या जागावाटपाच्या बैठकांमध्ये इतर छोट्या घटक पक्षांच्या नेत्यांना सहभागी करुन घेतलं जात नाही.
अद्याप जागावाटपाच्या चर्चेत सहभागी करुन घेतलेले नाही- रिपब्लिकन पक्ष : केंद्रीय सामाजिक राज्य मंत्री असलेल्या रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षानं विधानसभेसाठी 20 जागांची मागणी केलीय. त्यामध्ये मुंबईतील धारावी व चेंबूर या मतदारसंघाचा समावेश आहे. आमची युती भाजपासोबत आहे, मात्र महायुतीच्या आतापर्यंत झालेल्या जागावाटपाच्या चर्चेत आमच्या पक्षाला सहभागी करुन घेतलं नसल्याची खंत रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे यांनी व्यक्त केली. "आमची अद्याप मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत जागावाटपाबाबत चर्चा झालेली नाही. आम्ही आमच्या जागांच्या मागणीचं पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अगोदरच दिलंय. मात्र मित्रपक्षांकडून त्याबाबत पुरेशी दखल घेण्यात आलेली नाही," असं सोनावणे म्हणाले.
अंतिम निर्णय रामदास आठवले घेतील : रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे, जागावाटपाबाबत लवकरात लवकर चर्चा करावी, अशी मागणी गौतम सोनावणे यांनी केली. "जागावाटपात सन्मानजनक जागा मिळाल्या नाही, तर पुढे काय करायचं याचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष रामदास आठवले घेतील व त्याचं आम्ही पालन करु," असं गौतम सोनावणे यांनी स्पष्ट केलं.
आम्हाला पुरेसं महत्त्व दिलं जात : महाविकास आघाडीत असलेल्या समाजवादी पक्षानं राज्यात 12 जागांची मागणी केली. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये आम्हाला बैठकीला बोलावलं जात नाही, आम्हाला पुरेसं महत्त्व दिलं जात नाही. जागावाटपाची चर्चा केवळ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना ठाकरे गट या तीन पक्षातच होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केलाय. तसंच आपली दखल घेण्याची मागणीही त्यांनी केली. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांच्या सभेत राज्यातील चार उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी त्यावर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पक्षानं मानखुर्द शिवाजीनगर मधून विद्यमान आमदार अबू आसिम आझमी, भिवंडी पूर्व मधून विद्यमान आमदार रईस शेख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याशिवाय भिवंडी पश्चिम मधून रियाज आझमी व मालेगाव मधून शान ए हिंद यांना उमेदवारी जाहीर केलीय.
हेही वाचा