नागपूर Lok Sabha Elections 2024 : लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी करण्यात आल्याचं बघायला मिळतंय. 2014,2019 च्या निवडणूकीत भाजपानं युवांना केंद्र मानून प्रचाराची रणनीती आखली होती. त्याचप्रमाणे 2024 च्या निवडणूकीतही युवकांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. "विज्ञान, तंत्रज्ञान, स्टार्टअप, तरूणांना रोजगार देण्याबाबत केंद्र सरकारनं महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळं देशात गेल्या काही वर्षात बेरोजगारी कमी झाली आहे," असा दावा भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले तेजस्वी सुर्या : यावेळी बोलत असताना तेजस्वी सुर्या म्हणाले की, "पहिल्यांदा मतदान करणारे तरुण, युवा मतदार, व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न बघणारे युवा या करोडो युवामुळं 30 वर्षानंतर मोदींच्या नेतृत्वात स्थिर सरकार स्थापन झालं. जगात सर्वात वेगात पुढं जाणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. भारतीय जनता युवा मोर्चा देशातील तरुणाशी संवाद साधण्यासाठी मोठे आयोजन करत आहोत. 'नमो युवा चौपाल' हा कार्यक्रम देशात 2 लाख स्थानांवर सुरू आहे, " अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. "देशातील सर्वात मोठे युवा संमेलन 4 मार्च रोजी नागपुरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार यांच्यामुळं नागपूर महत्वपूर्ण स्थानांपैकी एक आहे. त्यामुळंच नागपुरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे."
2024 च्या निवडणुकीसाठी हुंकार : "राज्यातील किमान एक लाख तरुण नमो युवा महासंमेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनाला भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा संबोधित करणार आहेत. इंजिनिअरिंग, मेडिकल, आयआयटीमधील युवा यासाठी नोंदणी करत आहेत. तसंच क्रीडा, सिनेमा, विज्ञान, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी नेते असे प्रदेशातील टॉप इन्फ्लुइन्सर्स यात सहभागी होणार आहेत. हे केवळ युवा संमेलन नसून 2024 च्या निवडणुकीसाठी हुंकार आहे", असंही ते म्हणाले.
देशाचे तुकडे करणारी पार्टी म्हणजे काँग्रेस : पुढं कॉंग्रेसवर निशाणा साधत तेजस्वी म्हणाले की, "देशात भाजपामध्येच तरुणांना पुढं जाण्याची संधी मिळते. बर्थ सर्टिफिकेट नाही तर कॅरेक्टर सर्टिफिकेट बघून ही संधी दिली जाते. मी स्वतः एक उदाहरण आहे. तर देशाचे तुकडे करणारा काँग्रेस पक्ष आहे. राहुल गांधी एकीकडं 'भारत जोडो' यात्रा काढत असताना त्यांच्याच पक्षाचे खासदार पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतात", असा दावा करत त्यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.
दक्षिणेतील राज्यात भाजपा जिंकेल : "परिवारवादी नेते देशात बेरोजगारीचा मुद्दा पुढे करतात. मी देशाच्या अनेक भागात फिरताना सगळीकडं विकास दिसतोय. 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आलीय. नवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत. 1 लाख हायवेचे काम सुरू आहे. 10 वर्षात सर्वाधिक एअरपोर्ट निर्माण झाले आहेत. कर्नाटकसह दक्षिणेतील सर्वच राज्यात भाजपा लोकसभा निवडणुकमध्ये अधिक जागा जिंकणार आहे. आम्ही अनेक राज्यात विरोधीपक्ष म्हणून आहोत. पण सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहे", असं ते म्हणाले.
हेही वाचा -