पुणे Lok Sabha Elections 2024 : एकीकडं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. असं असतानाच आता सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातून स्वत:च आपली उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पहायला मिळतंय.
स्टेटस ठेवत केली घोषणा : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचं नाव आणि पक्ष चिन्हं असलेलं स्टेटस ठेवलं. पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंचा फोटो आहे. सुप्रिया सुळेंच्या या स्टेटसनंतर वेगवेगळे तर्क-वितर्क काढले जात आहेत. राज्यासह देशात विरोधकांनी इंडिया आघाडी केली आहे. इंडिया आघाडीतील मित्र पक्षांची जागावाटपावरून अजूनही चर्चा सुरू असताना खासदार सुळे यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे.
नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येण्याची शक्यता : मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विविध कार्यक्रम घेत नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. तर खासदार सुप्रिया सुळे देखील बारामती लोकसभेसाठी मॅरेथॉन आणि बैठका घेत असल्याचं बघायला मिळतंय. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल आठ तासांची बैठक घेतली होती. बारामतीत अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यास नणंद विरुद्ध भावजय अशी कुटुंबातच लढत पाहायला मिळणार असल्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याकडं लागलंय.
हेही वाचा -