नवी दिल्ली Lok Sabha Election Phase 2 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील प्रत्येकी 8 जागांसाठी आणि बिहारमधील पाच जागांसाठी मतदान झालं. तर केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, मध्य प्रदेशातील 6, आसाममधील 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 3, मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी एक जागेवर आज मतदान झालं. या टप्प्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. या टप्प्यातील 88 जागांसाठी एकूण 1202 उमेदवार रिंगणात आहेत.
दिग्गजांनी केलं मतदान : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गजांनी मतदान केलय. यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या निर्मला सीतारामन, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, वसुंधरा राजे शिंदे, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भारतीय क्रिकेट संघाचे कोच राहुल द्रवीड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय.
ओम बिर्लांनी केलं मतदान : दुसऱ्या टप्प्यात राजस्थानमधील कोटा येथील भाजपाचे उमेदवार ओम बिर्ला यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर ते म्हणाले की, "ही लढाई संविधान वाचवण्यासाठी नाही. संविधान चांगल्या हातात आहे. ते (विरोधक) फक्त खोटेपणा पसरवत आहेत,' असं बिर्ला म्हणाले.
निर्मला सीतारामन यांनीही केलं मतदान : केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या निर्मला सीतारामन यांनी कर्नाटकातील बेंगळुरुत मतदानाचा हक्क बजावला. 'प्रत्येकानं घराबाहेर पडून मतदान करावं,' असं आवाहन त्यांनी मतदानानंतर केलय. भारताला प्रत्येक मताची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या.
शशी थरुर मतदानासाठी रांगेत : केरळमधील काँग्रेस खासदार आणि तिरुअनंतपुरमचे उमेदवार शशी थरूर, त्यांच्या मतदारसंघातील मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे असून मतदान केलं. येथे त्यांची लढत भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याशी आहे.
दिग्गजांचं भवितव्य पणाला :
- वायनाड - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. या जागेवरुन डाव्यांनी ॲनी राजा यांना तर भाजपानं राहुल यांच्या विरोधात के सुरेंद्रन यांना उमेदवारी दिलीय.
- कोटा - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भाजपाच्या तिकीटावर राजस्थानातील कोटा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ओम बिर्ला यांच्यासमोर भाजपा सोडून पक्षात दाखल झालेल्या प्रल्हाद गुंजाळ यांना काँग्रेसनं तिकीट दिलंय.
- मेरठ - अरुण गोविल उत्तर प्रदेशातील मेरठमधून उमेदवार असल्यानं चर्चेत आहेत. भाजपानं अरुण गोविल यांना मेरठमधून उमेदवारी दिलीय.
- पूर्णिया - पप्पू यादव बिहारच्या पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. पप्पू काँग्रेसकडून तिकीटासाठी उमेदवार होते. पण या जागेवरुन आरजेडीनं आपला उमेदवार उभा केलाय.
- खजुराहो - मध्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष व्ही डी शर्मा खजुराहो मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण 'इंडिया' आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळल्यामुळं ही जागा चांगलीच चर्चेत राहिली.
- बंगळुरु ग्रामीण - कर्नाटकातील बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे जावई सी एन मंजुनाथ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश यांच्या विरोधात भाजपानं सी.एन. मंजुनाथ यांना तिकीट दिलं आहे.
- अमरावती - महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून हनुमान चालीसामुळं चर्चेत आलेल्या नवनीत राणांना भाजपानं उमेदवारी दिलीय. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे बळवंत वानखडे आणि प्रहारच्या उमेदवाराचं आव्हान आहे.
4 जूनला लागेल निकाल : यंदा लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 102 जागांवर मतदान झालं होतं. तर सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी मतमोजणीनंतर समोर येतील.
हेही वाचा :