हैदराबाद Rahul Gandhi Travels In RTC Bus : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (9 मे) रात्री तेलंगणातील हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केलं. यानंतर राहुल गांधी यांनी तेलंगणामधील बसमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवादही साधला. राहुल गांधींना बसमध्ये पाहून प्रवाशीही आश्चर्यचकित झाले.
प्रवाशांशी साधला संवाद : बसमध्ये राहुल यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही उपस्थित होते. मलकाजगिरी लोकसभा मतदारसंघातील सरूरनगर येथे जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर राहुल गांधी तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (TSRTC) बसमध्ये चढले. यावेळी राहुल गांधी यांनी प्रवाशांमध्ये 'पंच न्याय' माहितीपत्रकांचं वाटप केलं. राज्यातील काँग्रेस सरकारच्या मोफत बस प्रवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत लोकांकडून माहिती घेतली. प्रवाशांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी महिला, युवक, शेतकरी आणि कामगार अशा विविध घटकांसाठी काँग्रेसनं आपल्या राष्ट्रीय जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची माहिती दिली. राहुल गांधींना बसमध्ये प्रवास करताना पाहून प्रवाशांना आश्चर्य वाटले. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. तेलंगणा सरकारकडून बसमध्ये महिलांना मोफत प्रवास देण्याची योजना राबविली जाते.
भाजपावर टीका : तत्पूर्वी झालेल्या जाहीर सभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपावर टीकेची तोफ डागली होती. भाजपाकडून राज्यघटना मोडीत काढण्याचा भाजपाला डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी केला. तसंच राज्यघटनेचं रक्षण करण्याची आम्ही शपथ घेतल्याचंही राहुल म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, " मोदी सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचं खासगीकरण केलं. कंत्राटी पद्धतीमधील आरक्षण काढून टाकण्यास प्रोत्साहन दिलं. त्यामुळं सत्तेत आल्यास काँग्रेस जातीचं सर्वेक्षण करेल. जेणेकरून मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य वर्गातील गरीबांना त्यांची लोकसंख्या आणि त्यांचा वाटा-सत्ता काय आहे हे कळेल, असं राहुल गांधींनी सांगितलं.
हेही वाचा -
- टेम्पोमध्ये पैसे देतात हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना पलटवार - Congress On PM Modi
- आजपासून प्रियंका गांधी घेणार अमेठी, रायबरेलीची सूत्रं हाती; दोन वॉररूममधून सुरू केलं काम - Lok Sabha Election 2024
- रोहित वेमुला प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राहुल गांधींवर जोरदार टीका; म्हणाल्या... - Nirmala Sitaraman