नांदेड : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नांदेडमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपाला रामराम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय. चिखलीकर यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेच त्यांना लोहा कंधारची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळं केवळ उमेदवारीसाठी चिखलीकरांनी पक्षप्रवेश केल्याचं बोललं जातय.
अशोक चव्हाण यांचा केला होता पराभव : जिल्ह्यात प्रताप पाटील चिखलीकर यांची मातब्बर नेता अशी ओळख आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपानं चिखलीकरांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात मैदानात उतरवलं होतं. तेव्हा एक लाखांहून अधिक मताधिक्यानं चिखलीकरांनी चव्हाणांचा पराभव केला होता.
उमेदवारीसाठी बदलला पक्ष? : चिखलीकर यांनी लोहा कंधार विधानसभा मतदार संघातून दोन वेळेस प्रतिनिधित्व केलय. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा कंधार मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मतदार संघात त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. हा मतदारसंघ भाजपाला सुटेल अशी शक्यता होती. मात्र, ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आली. त्यामुळंच चिखलीकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातय. त्यांच्या या निर्णयामुळं नांदेडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
चिखलीकर यांचा राजकीय प्रवास : प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1989 साली सरपंच पदापासून झाली. 1989 ते 1992 पर्यंत ते सरपंच होते. त्यानंतर 1992 ते 2004 पर्यंत ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यांनी सभापती, उपाध्यक्ष पदावरही काम केलं. 2004 मध्ये चिखलीकर यांनी लोहा कंधार मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 2014 च्या निवडणुकीतही त्यांनी 50 हजार मतांनी विजय मिळवला. त्यानंतर 2019 मध्ये ते भाजपा खासदार झाले.
हेही वाचा -
- राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; सुनिल टिंगरेंना पुन्हा उमेदवारी, झिशान सिद्दीकींचा राष्ट्रवादी प्रवेश
- विधानसभा निवडणूक 2024 : राष्ट्रवादीच्या 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, सयाजी शिंदे, रुपाली चाकणकरांसह 'या' नेत्यांचा आहे समावेश
- बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार लढत; अजित पवार यांना उमेदवारी जाहीर