मुंबई Maharashtra Assembly letter : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात मोठे फेरबदल होताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेनं निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या मतदानाबाबत स्पष्टता मागितली आहे.
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा सचिवालय सज्ज झाले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. महाराष्ट्रात सहा जागांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीने जर चौथा उमेदवार दिला नाही तर महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होईल. मात्र भाजपा चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यामुळं राज्यसभा निवडणूक होणार असल्याचं बोललं जातंय.
निवडणूक आयोगाला पत्र : महाराष्ट्रात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. दोन्ही पक्षातील गटांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावे केले होते. सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळं या दोन्ही पक्षांना विधिमंडळात मान्यता मिळाली असून सभागृहात अधिकृत नोंद झाली आहे. तर दुसरीकडं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला नवीन पक्ष, नावं दिली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या गटाला दिलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र : राज्यसभा निवडणुकीपुरतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटाला सभागृहात अधिकृत मान्यता मिळाली नाही. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीत या दोन्ही गटांच्या मतदानाविषयी पेच निर्माण झाला आहे. त्या निमित्तानं महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून ठाकरे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या मतदाना विषयी स्पष्टता मागितली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्हिप कोणाचा लागू होणार या सर्व बाबींविषयी केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टता द्यावी, अशी विनंती महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडं पत्राद्वारे केली आहे. त्यामुळं केंद्रीय निवडणूक आयोग पत्राला काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा -