मुंबई Anil Parab On Ramdas Kadam : माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्याकडून मोठा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. आज (2 एप्रिल) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला असून लवकरच या प्रकरणाची सर्व कागदपत्रं सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी किरीट सोमैयांमध्ये (Kirit Somaiya) हिंमत असेल तर रामदास कदमांवर कारवाई करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं. त्यामुळं यावर आता रामदास कदम आणि किरीट सोमैयांकडून काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल परब? : यावेळी बोलत असताना अनिल परब म्हणाले की, "रामदास कदम स्वत: काचेच्या घरात राहून दुसऱ्याच्या घरावर दगड मारताहेत. दापोलीतील साई रिसॉर्ट अनाधिकृत असल्याची माहिती रामदास कदमांनी किरीट सोमैयांना दिली. आगामी काळात रामदास कदमांचे 12 -13 घोटाळे मी बाहेर काढणार आहे. सध्या दोन प्रकरणाचे पुरावे मी सोमैयांना देणार आहे. रामदास कदमांनी मंत्री असताना पदांचा गैरवापर करुन भूखंड घोटाळा केला. आता यांच्यावर काय कारवाई होते बघायचंय. किरीट सोमैया रामदास कदमांना आत टाकण्याची भाषा करतात का?, त्यांच्यावर कारवाई करणार का? हे बघायचंय. तसंच या प्रकरणाची सोमैया यांनी ईडी चौकशीची मागणी करावी", असं देखील परब म्हणाले.
सरकारी यंत्रणांचा गैरवापर : पुढं ते म्हणाले की, "रत्नागिरी जिल्ह्यातील जांबुर्डे येथे रामदास कदम आणि त्यांच्या मुलांनी भूखंड घोटाळा केला. तसंच मुंबईतील एसआरमध्ये देखील भूखंड घोटाळा झालाय. रामदास कदम हे मंत्री आणि विरोधी पक्षनेते होते. त्यांचा मुलगा आमदार आहे. या सर्वांनी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करुन भूखंड लाटलाय. या सर्व प्रकरणाची मी रत्नागिरीचे एसपी यांच्याशी चर्चा करणार आहे. जे निकषात आणि नियमात बसत नाही ती जमीन रामदास कदम यांनी घेतली आहे."
सोमैयांवर हल्लाबोल : "सोमैया महाराष्ट्रभर फिरत महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करायचं म्हणताय. परंतु, आता मी त्यांना भेटणार आहे. त्यांनी मला वेळ द्यावा. आता बघूया सोमैया काय कारवाई करतात. कारण हा नाXX पोपट सतत आरोप करत असतो. कमीत कमी घरच्यांचा तरी विचार करायचा. यांच्या ठिकाणी दुसरं कोण असतं तर घरातून बाहेर पडलं नसतं", असं म्हणत परब यांनी सोमैयांवर निशाणा साधला.
कदमांच्या पापात सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग? : पुढं बोलताना अनिल परब म्हणाले की, "जेव्हा साई रिसॉर्टचं बांधकाम झालं, तेव्हा सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून हे बांधकाम झाल्याचं आरोप आमच्यावर करण्यात आला. यानंतर यात सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं म्हणत गुन्हे दाखल केले. आता रामदास कदम यांच्या भूखंड घोटाळ्यात सरकारी यंत्रणांचा आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, त्यामुळं आता या सरकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? हे पाहावं लागेल", असंही ते म्हणाले. तसंच माझ्यासोबत आलेल्यांना मी निवडून आणेल, नाहीतर गावी जाऊन शेती करेल, असं शिंदेंनी म्हटलं होतं. परंतू, आता शिंदे गटाला मुंबईत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळत नाही, ही यांची ताकद आहे, असा खोचक टोलाही अनिल परबांनी शिंदे गटाला लगावला.
हेही वाचा -