मुंबई Kirit Somaiya On Sanjay Raut And Arvind Kejriwal : भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या ईडी कोठडीचा संदर्भ देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसंच "अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत आहेत. तर महाराष्ट्रातील वाईन घोटाळा प्रकरणात संजय राऊत हे सुद्धा तुरुंगात जाऊ शकले असते, मात्र ते वाचलेत. वाईन घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी आता उत्तरं द्यावीत. संजय राऊत यांच्या कुटुंबानं सुद्धा वाईन व्यवसाय सुरू केला होता. अशोक गर्ग यांच्या कंपनीमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या मुली अचानक कशा भागीदार झाल्या याची माहिती समोर आली पाहिजे", असंही सोमैया म्हणाले आहेत.
वाईन पॉलिसीत ठाकरेंनी बदल केला : पुढं ते म्हणाले की, "तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केवळ संजय राऊत यांना फायदा मिळावा यासाठी वाईन विक्री धोरणामध्ये नवीन बदल केला. किराणा दुकानांमध्ये सुद्धा वाईन देता येणार असा निर्णय घेतला गेला होता. हा निर्णय केवळ संजय राऊत यांना शेकडो कोटी रुपयांचा फायदा मिळावा यासाठी होता. आता या सगळ्याची माहिती जनतेसमोर ठेवावी. या बाबतीत काळा पेपर जाहीर करावा", अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.
कंसाशी तुलना करून सुटका नाही : आज (23 मार्च) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना, "कंस मामाला ज्यांची भीती होती, त्या सगळ्यांना त्यानं तुरुंगात टाकलं. कंस मामानं देवाला देखील तुरुंगात टाकलं होतं. श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि कंसाचा वध केला. कंस मामाला भीती वाटत आहे, त्यामुळे विरोधकांना तुरुंगात टाकत आहेत," अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत किरीट सोमैया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आतापर्यंत अनेक वेळा अनेक जणांशी तुलना करण्यात आली आहे. त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले. कधी सोनिया गांधी यांच्याकडून त्यांच्यावर खुनाचे आरोप करण्यात आले, तर कधी त्यांना चायवाला म्हणून हिणवण्यात आलं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांची तुलना औरंगजेबाशी केली, आणि आता संजय राऊत त्यांना कंस म्हणत आहेत. मात्र, संजय राऊत काहीही म्हणत असले तरी त्यांनी केलेल्या घोटाळ्यांचा त्यांना हिशोब द्यावाच लागेल, असं सोमैया म्हणाले.
हेही वाचा -