सातारा Jayant Patil : परिस्थिती अवघड आहे. संकटाची आहे. आपलीच माणसं फुटल्यामुळं परिस्थिती जास्त गंभीर वाटायला लागली आहे. परंतु, जे गेलेले आहेत ते अडचणीमुळे गेलेले आहेत. त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या. आपण नीट राहुया. लोकं फार पोहचलेली आहेत. कधी तुम्हाला, आम्हाला पोहचवतील याचा नेम नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून केलं.
राष्ट्रवादी फोडूनही भाजपाच्या मतांची बेरीज नाही : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील पाटणमध्ये झालेल्या मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. "आज लोक पक्ष सोडून का जात आहेत, हे लहान मुलालाही कळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाची मतांची बेरीज होत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. शरद पवार झुकत नाहीत म्हणून ते नको आहेत. शरद पवार हो म्हणत नाहीत त्यामुळं त्यांचा त्रास होत आहे, शरद पवार तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत म्हणून केंद्रातील सत्ताधाऱ्यांची अडचण होत आहे," असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.
यशवंतरावांची संस्कृती बिघडली : आपल्यापुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपला पक्ष फुटून आपले काही सहकारी सत्तेत सहभागी झाले आहेत. परंतु, महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेली संस्कृती आज बिघडलेली आहे. काही लोकांचा सत्तेत जाण्याचा मोह काही कमी होताना दिसत नाही. सत्ता व पैसा याचे एक विचित्र सूत्र आणि नातं महाराष्ट्रात सत्तेत बसणाऱ्या लोकांनी तयार केले असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.
आमदारही व्यावसायिक झाले : उल्हासनगरमध्ये भाजपा आमदारानं केलेल्या गोळीबाराचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, "आमदारही व्यावसायिक झालेले आहेत. ते सुद्धा जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. आमदारांच्या जमिनीत जर कोणी दुसरा घुसला तर त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो. महाराष्ट्रातच नाही तर बिहारमध्ये देखील पोलीस स्टेशनमध्ये कधी गोळीबार झाला नसेल. बिहारची सुधारणा झाली, पण आमची अधोगती एवढी झाली आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना राज्य आवरत नाही, अशी परिस्थिती आहे."
श्री रामाचा आशिर्वाद घेऊन काम सुरू करा : "लोकसभा आणि विधानसभेला झाडून काम झालं पाहिजे. आपण सर्वांनी सक्षमपणाने पक्षाचे काम सुरू करावे. आपण पाटणमधील सभा ही प्रत्यक्षात श्री रामाच्याच दारात घेतल्यामुळं रामाचा आशिर्वाद घेऊन आपणही कामाला सुरुवात करावी," असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
सत्तेत जाणे आवश्यक : पाटण तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. त्यासाठी सत्तेत जाणं आवश्यक असल्याचं सूचक वक्तव्य माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केलं. त्यासाठीची लढाई आपल्याला लढावी लागणार असल्याचे पाटणकर म्हणाले. छगन भुजबळांनी राजीनामा दिला. मग त्यांनी कालपर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाग घेतला की नाही. त्यांनी आपल्या खात्याचा कारभार केला की नाही, असे सवाल माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
हेही वाचा -