पुणे Jayant Patil on BJP : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी झालेल्या बैठकीत त्यांनी महायुतीच्या नेत्यांची कानउघाडणी केली असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललंय हे अमित शाह यांना कळत नाही. मनासारखं काम देवेंद्र फडणवीस यांना राज्यात करता येत नाही. त्यामुळं त्यांची पंचायत झाली. जनतेनं अमान्य केलेलं हे त्रिकुट आहे," असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला.
अजित पवार विधानसभा वेगळे लढू शकतात : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं 'महाराष्ट्र व्हिजन 2050' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जयंत पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? विधानसभेसाठी भाजपाची अजित पवारांबाबत भूमिका काय? यावरही स्पष्ट मत जयंत पाटील यांनी मांडलं. "विधानसभेत भाजपा अजित पवार यांना वेगळं लढवण्यास सांगू शकतं व निकालानंतर एकत्र येण्याचा प्लॅन असू शकतो," अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
योजना निवडणुकीसाठी : सत्तेत आल्यास 'लाडकी बहीण योजना' बंद करणार का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, "पैशांची गरज कोणाला जास्त आहे हे सरकारनं ओळखलं पाहिजे. एखाद्या महिलेच्या घरी खरंच बिकट परिस्थिती असेल किंवा तिच्या घरी कर्तापुरुष नसेल आणि तिला पैशांची गरज असेल तर तिला पैसे दिले पाहिजेत. सरसकट वाटप हे फक्त निवडणुकीसाठी आहे. निवडणुकीनंतर या योजना सत्ताधारी विसरणार आहेत."
अजित पवारांना टोला : शरद पवार यांच्या मनातलं जयंत पाटलांना कळतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते. यावर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं की, "जास्त काळ सोबत राहिलो की सर्व कळतं." अजित पवार यांच्याबाबत जेव्हा पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मला कळतं पण मी बोलणार नाही. मोठ्या पवारांच्या मनातील कळणं हे डिफिकल्ट टास्क आहे, पण बाकीच्यांबाबत मी बोलत नाही."
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे महत्त्वाचं नाही : "भाजपाच्या पुढाकारानं निर्माण झालेलं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य आहे. मुख्यमंत्री कोण होतं हे सध्या महत्त्वाचं नाही. त्यामुळं शरद पवार हे सर्वांना एकसंघ ठेवत आहेत," असं म्हणत जयंत पाटलांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावर स्पष्ट बोलणं टाळलं.
हेही वाचा -
- महाराष्ट्रातून भाजपा घालवा, मग दिल्लीतील मोदी सरकार घालवायला वेळ लागणार नाही, जयंत पाटील यांचा हल्लाबोल - Jayant Patil On BJP
- "शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोलाही...", देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया - Jitendra Awhad
- 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावानं आग्रही असलेले शरद पवार यंदा मागे का? - Face of Chief Minister