मुंबई Voting Percentage : केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदानाची वाढीव आकडेवारी सिद्ध केल्यानंतर आता त्याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. मतदानाच्या वाढीव आकडेवारीनंतर याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. हा सत्ताधारी पक्षाचा डाव असून निवडणूक जिंकण्यासाठी हे अतिरिक्त मतदान केल्याचा आरोप होत असला तरी प्रत्यक्षात यात तथ्य नाही ही वाढीव आकडेवारी अंतिम पडताळणी नंतर जाहीर केलेली असते, असं स्पष्टीकरण राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी दिलंय.
सुधारित आकडेवारी प्रसिद्ध : राज्यात निवडणूक आयोगानं दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी मतदानाच्या दिवशी रात्री साडेअकरा वाजता प्रसिद्ध केली. त्यानुसार ही आकडेवारी 59.62% इतकी होती तर निवडणूक आयोगाकडून दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी 62 टक्क्यांपेक्षा अधिक होती. त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी ही आधी कमी टक्के दाखवण्यात आली होती नंतर ती आकडेवारी वाढली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
मतदानाची आकडेवारी कशी वाढली : दरम्यान यासंदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीबाबत आक्षेप व्यक्त केलाय. मतदान झाल्यानंतर दोन दिवसांनी ही वाढीव आकडेवारी कशी काय जाहीर होऊ शकते? भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हा डाव आखला जातोय का असा संशय राऊत त्यांनी व्यक्त केलाय.
वाढीव आकडेवारी समाधानकारक : तर यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नकार देत मतदानाची वाढलेली आकडेवारी ही अधिक स्वागतार्ह आहे. पहिल्या टप्प्यात मतदानाची आकडेवारी कमी झाली होती. त्याला अनेक कारणं होती मात्र दुसऱ्या टप्प्यात जर मतदानाची आकडेवारी वाढली असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि यापुढं सातत्यानं मतदान वाढलं पाहिजे तरच ते लोकशाहीसाठी योग्य असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तसंच मतदारांनी आता घरातून बाहेर पडून मतदान केलं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वाढीव मतदानावर शंका घेणं योग्य नाही : दरम्यान, याबाबत निवडणूक आयोगाचे सहमुख्य अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावरील आकडेवारी ही अंदाजे जाहीर केली जाते. ती अंतिम आकडेवारी नसते. निवडणूक आयोग जोपर्यंत फॉर्म 17 सी पडताळणी करुन पूर्ण भरला जात नाही तोपर्यंत अंतिम आकडेवारी म्हणत नाही. ही अंतिम आकडेवारी अनेक कारणांमुळं विलंबानं येऊ शकते. आदिवासी आणि दुर्गम भागातील मतदान केंद्रावरील मतपेट्या संग्रहित करणं तसंच उशिरापर्यंत काही कारणास्तव जर मतदान झालं असेल तर तेथील आकडेवारी ही उशिरा येते. अशा स्थितीत दुसऱ्या दिवशी सर्व मतपेट्या आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीकडे दिलेल्या फॉर्म 17 सी यावर योग्य आणि बिनचूक आकडेवारी नोंदवलेली असते. त्यामुळं उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदानाची टक्केवारी अथवा आकडेवारी ही अंतिम होण्यापूर्वी माहीत असते. त्यानुसारच सर्व पडताळणी करुन आकडेवारी अंतिम केली जाते. त्याला कदाचित दुसरा दिवस किंवा तिसरा दिवसही उजाडला जाऊ शकतो. मात्र त्यामुळं वाढीव मतदानाच्या टक्केवारीवर शंका घेणं योग्य नाही. नियमांनुसारच ही कारवाई होत असते. त्यामुळं अंतिम आकडेवारी थोडीफार टक्केवारी वाढलेली आपल्याला दिसून येतं असते."
हेही वाचा :