मुंबई INDIA Rally Mumbai : मुंबईतील शिवाजी पार्क इथं विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या मेळाव्याचा खरपूस समाचार घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीय. त्यांच्या या वक्तव्याला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेनिकांसाठी काळा दिवस : इंडिया आघाडीच्या सभेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटलं, "ज्या शिवतीर्थावर बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्याच ठिकाणी काँग्रेसची सभा आहे. त्याठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जणं बसलेत. त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं."
राहुल गांधींची बाळासाहेबांना आदरांजली : विशेष म्हणजे कॉंग्रेस खासदार राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्क येथे सभेद्वारे केला. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, आरजेडी नेते तेजस्वी यादव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शिवसेना संस्थापक बाळसाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देत त्यांना आदरांजली वाहिली.
- संविधानाचं रक्षण करणारे देशभक्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "जे प्रामाणिकपणे संविधानाचं रक्षण करतात ते देशभक्त असतात. जे सत्तेसाठी आहेत. सीबीआय आणि ईडीला घाबरणाऱ्यांना कोणतेही अधिकार नाहीत."
ते इथून तिकडे गेले तो काळा दिवस होता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपयांची लाच देऊन शिवसेनेतील 50 आमदारांना आपल्या बाजूला घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रासाठी तो काळा दिवस होता. जेव्हा अजित पवारांनी इतर 40 आमदारांसह आमचा पक्ष सोडला, तो दिवस महाराष्ट्रासाठी 'काळा दिवस' ठरला.
हेही वाचा :