मुंबई Gautam Adani Meet CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते. मात्र, या बैठकीमागचं कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्यानं यावरुन आता तर्क-वितर्क काढले जात आहेत.
धारावी प्रकल्पबाबत चर्चा : मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यात बंद दाराआड जवळपास एक तास बैठक झाली. सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. त्यांची ही बैठक पार पडल्यानंतर रात्री उशिरा गौतम अदानी 'वर्षा'वर दाखल झाले. त्यानंतर चौघांची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत धारावी प्रकल्पाला होणारा विरोध यावर चर्चा झाली. हा प्रकल्प कशाप्रकारे राबवायचा? विरोधकांना कसं शांत करायचं? आदीबाबत बैठकीत खलबतं झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र, या बैठकी संदर्भात अद्याप कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
अदानी सिटी होऊ देणार नाही : डिसेंबर 2023 मध्ये महाविकास आघाडी आणि मुख्यतः शिवसेना ठाकरे पक्षानं धारावी ते बांद्रा इथपर्यंत भव्य मोर्चा काढला होता. शिवसेना ठाकरे पक्षाकडून अदानी प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार तसंच गौतम अदानी यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली होती. यानंतर मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी धारावी प्रकल्प मुंबईत होऊ देणार नाही, असा इशारा दिला. तसेच मुंबईची जागा अदानीच्या घशात घालू देणार नाही, असे ठणकावून सांगितलं. तसंच हे सरकार उद्योगपतीसाठी असलं तरी मुंबईची आम्ही अदानी सिटी होऊ देणार नाही, असं म्हणत त्यांनी राज्य सरकार आणि अदानी ग्रुपवर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गौतम अदानी यांच्यातील ही बैठक महत्त्वाची मानली जातं आहे.
हेही वाचा -