नांदेड Funeral Of Vasantrao Chavan : काँग्रेसचे जेष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं सोमवारी (26 ऑगस्ट) सकाळी निधन झालं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं वसंतराव चव्हाण यांच्यावर हैदराबादमधील किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वसंतराव चव्हाण यांच्यावर आज (27 ऑगस्ट) नांदेडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, नितीन राऊत तसंच भाजपाचे अशोकराव चव्हाण, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नांदेडचे स्थानिक नेते, काँग्रेस कार्यकर्ते आणि चव्हाण यांचे समर्थक उपस्थित होते.
पोलीस दलातर्फे अंतिम सलामी : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चव्हाण यांना राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. मंत्री महोदयांसोबत शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून त्यांना अंतिम सलामी देण्यात आली.
46 वर्षांचा राजकीय प्रवास : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यामुळं काँग्रेसचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली. अशात लोकसभा निवडणूक मी पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचं जाहीर करुन वसंतराव यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला. खासदार म्हणून निवडून येण्याअगोदर ते एकदा विधानपरिषदेचे तर दोनदा विधानसभेचे आमदार होते. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात गावच्या सरपंचपदापासून झाली. 1978 ते 2002 अशी सलग 24 वर्ष ते सरपंच पदावर होते. नंतर पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, 16 वर्षे आमदार आणि 2024 मध्ये ते लोकसभा सदस्य झाले होते. शांत आणि संयमी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं नांदेडवर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा -