भोपाळ Kamal Nath BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आता काँग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपाच्या वाटेवर आहेत.
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुल नाथ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच नकुल नाथ यांनी X या सोशल मीडियावर प्रोफाईलमधून काँग्रेसचं नाव हटविलं आहे. कमलनाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. कमलनाथ आज दुपारी दिल्लीत पोहोचल्यानंतर माध्यमांनी त्यांना भाजपामधील प्रवेशाबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी "असे काही असेल तर मी तुम्हाला आधी कळवीन, असं उत्तर दिलयं.
काँग्रेसचे 10 आमदारही वाटेवर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता वेग मिळतोय. दिल्लीत भाजपाचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू असताना कमलनाथ यांनी छिंदवाडा येथे होणारी परिषद आणि 18 फेब्रुवारी रोजी तामिया येथे होणारी सभा रद्द केली. ते भोपाळला रवाना झाले आहेत. कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या हवाल्यानं वृत्त आहे की, खासदार नकुल नाथ यांच्यासह कमलनाथ यांच्या जवळचे 10 आमदार आणि अनेक समर्थक भाजपात प्रवेश करू शकतात. कमलनाथ यांच्यासह त्यांना पाठिंबा देणारे 10 आमदारही भाजपात जाणार असल्याचं निश्चित मानलं जातंय. यासोबतच अनेक माजी मंत्री, आमदार आणि कमलनाथ समर्थक काँग्रेस कार्यकर्ते भाजपाचं सदस्यत्व घेऊ शकतात.
काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार : ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश भटनागर म्हणतात - "2023 ची विधानसभा निवडणूक कमलनाथ यांच्या राजकीय कारकीर्दीची शेवटची निवडणूक होती. त्यात ते अयशस्वी झाले. कमलनाथ भाजपात जात असतील तर त्याचं हेच कारण असू शकतं. आता एवढा मोठा नेता एकटा जाणार नाही हे निश्चित. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार आहे."
कमलनाथ यांनी काँग्रेस सोडली तर यामागचं कारण काय : कमलनाथ यांनी काँग्रेसची साथ सोडली तर त्यामागची कारणं पाच मुद्यांत समजून घ्या.
- 2023 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कमलनाथ यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे.
- त्यांची शेवटची आशा राज्यसभेसाठी होती. मात्र ज्या प्रकारे त्यांना बाजूला करण्यात आलं, त्यामुळे कमलनाथ संतापले असल्याचं बोललं जात आहे.
- राहुल गांधींनी मध्य प्रदेशात काँग्रेसचे तरुण चेहरे पुढे केले आहेत. याचा अर्थ भविष्यातही कमलनाथ यांना कोणतीही संधी मिळण्याची शक्यता नाही.
- आगामी लोकसभा निवडणुकीत कमलनाथ छिंदवाडा ही त्यांची राजकीय जागा वाचवण्याचा प्रयत्न करतील.
- कमलनाथ राजकारणातून निवृत्तीकडे वाटचाल करत आहेत. मात्र नकुलनाथ यांचं राजकीय भवितव्य आताच सुरू झालं आहे. हे भविष्य काँग्रेसमध्ये मजबूत दिसत नाहीत.
हे वाचलंत का :