छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला स्प्ष्ट बहुमत मिळालं. त्यामुळं आता त्यांचाच मुख्यमंत्री होणार हे जरी निश्चित असलं तरी तो चेहरा कोण? यावर अजूनही अधिकृत निर्णय आलेला नाही. गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही मुख्यमंत्रिपदाचा पेच अजूनही कायम आहे. अशातच आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक विधान करुन भाजपाचं टेन्शन वाढवलं असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे दरे गावात : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यानंतर आज मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. मात्र, एकनाथ शिंदे हे आपल्या दरे या गावी जात असल्यानं ही बैठकही रद्द करण्यात आली होती. त्यामुळं चर्चांना उधाण आलं होतं. अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत चर्चा, नंतर मुंबईत महायुतीची बैठक आणि त्यातच शिंदे हे थेट दरे गावात जाणं, यामुळं अजूनही मुख्यमंत्रिपदावरुन सर्वकाही ठीक नसल्याचं दिसून येत आहे.
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: Shiv Sena leader Sanjay Shirsat says, " whenever eknath shinde thinks that he needs some time to think he goes to his native village...when he (eknath shinde) has to make a big decision he goes to his native village. by tomorrow… pic.twitter.com/cEb5akzWrM
— ANI (@ANI) November 29, 2024
शनिवारी होणार मोठा निर्णय : "अशी काही राजकीय परिस्थिती आली तर एकनाथ शिंदे हे थेट त्यांच्या दरे गावात जातात. तिथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत संपर्क होत नाही. त्यांचा मोबाईलही तिथे लागत नाही. राजकीय परिस्थितीवर काही विचार करायचा असेल तर ते दरे या गावाला प्राथमिकता देतात. काही मोठा निर्णय करायचा असेल तर ते दरे गावात जातात. आताही ते गावाला गेले आहेत. त्यामुळं उद्या (शनिवारी) सायंकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेणार," असं सूचक विधान करत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी महायुतीचं टेन्शन आणखी वाढवलं.
2 डिसेंबरला शपथविधी? : "महाराष्ट्रातील नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ठरवतील. मला माहिती मिळाली आहे की, मुख्यमंत्र्याचे नाव मध्यरात्री जाहीर होईल. तसंच 2 डिसेंबरला शपथविधी होणार आहे. एकनाथ शिंदे हे दिल्लीतील राजकारणात जाणार नाहीत. दिल्लीच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना जास्त रस आहे," अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
हेही वाचा