मुंबई : विधानसभा निवडणूक निकालात महायुतीनं जोरदार प्रदर्शन केलंय. जवळपास दोऩशे जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. त्यामुळं हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केलाय. कुठे मिठाई वाटत, तर कुठे ढोल-ताशे वाजवत कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्रिपदी कोण? : निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून, महाराष्ट्रातील मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. "राज्यात लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळं आमचा विजय होत आहे," असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.तसंच मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, "संपूर्ण निकाल लागल्यानंतर आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ." राज्यात सर्वात जास्त उमेदवार निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल असं काही ठरलेलं नाही ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री? : "आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेनं पोचपावती दिली. या विजयामुळं पुढील काळात आमची जबाबदारी वाढणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महायुती सरकारची 'लाडकी बहीण योजना' : राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या हेतुने 'लाडकी बहीण योजने'ची घोषणा महायुती सरकारनं केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आली होती. आतापर्यंत अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. या योजनेचा जोरदार प्रचार हा महायुतीतील पक्षांनी केला होता. तसंच सत्ता आल्यावर या योजनेच्या रक्कमेत वाढ करण्याचं आश्वासनंही महायुती सरकारनं दिलं होतं. आता याच योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीत झाल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.
हेही वाचा -