नागपूर Devendra Fadnvis : भारतीय जनता पार्टीचा आज 45 वा स्थापना दिवस असल्यानं नागपुरात भरगच्च कार्यक्रम शहर भाजपाकडून आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्त भाजपा कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी भाजपा कार्यक्रर्त्याना शुभेच्छा दिल्या. तसंच एक मोठी घोषणाही केलीय.
33 जागा लढवण्याचा दावा केला नाही : यावेळी महायुतीतील जागावाटपाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, "तीन पक्ष सोबत आहेत. मित्र पक्षांचा सन्मान राखणं हेदेखील महत्त्वाचं आहे. राज्यात 33 जागा आम्ही लढवू, असा दावा कधीही केला नाही. आमचा प्रयत्न होता की तिघांचा सन्मान राखून ज्या जागा मिळतील त्यावर आम्ही तर समाधानी आहोत."
कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदेच : कल्याण लोकसभेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, "कल्याणमध्ये शिवसेनेच्या श्रीकांत शिंदें यांना भाजपचा विरोध नाही. कल्याण लोकसभेचे ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. संपूर्ण ताकतीनं आणि मागच्या वेळीपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे कल्याण मधून निवडून येतील."
जयंत पाटील दिसेनासे झालेत : जयंत पाटील हे स्वतः इतके इनरिलेव्हेंट झाले. इतके नाराज आहेत की, त्यांच्या पक्षात त्यांना कुणी ही विचारत नाही. ते अलीकडच्या काळात स्टेस्टमेंट देत असतात. ते कुठे दिसतात का, एवढी मोठी निवडणूक चाललीय. पण ते कुठे आहेत का? शरद पवार, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे दिसतात मात्र ते दिसत नाहीत, असं म्हणत त्यांनी जयंत पाटील यांना टोला लगावलाय.
तीन दिशेला धावणारी तीन इंजिनं : महाविकास आघाडीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, "कुणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन चांगलं केलेलं आहे. महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल ते केवळ इंजिन आहे. यांना इकडे डब्बा नाही. त्यामुळं बसायची जागादेखील नाही. सर्व इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चालली आहेत. केवळ इंजिन एका रांगेत उभे करुन हात वर करुन आम्ही एकत्रित आहोत, असं सांगायचं आणि पुन्हा आपले इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेनं जायचं अशा इंजिन मध्ये कुणाचीही बसायची इच्छा नाही."
हेही वाचा :