नागपूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्यात पोहचला असून, राजकीय नेते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनतेत प्रचंड दहशत असल्याचा गंभीर आरोप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केलाय. ते आज नागपुरात बोलत होते.
लोक महायुतीच्या सरकारवर नाराज : रोहित पवार निवडणूक प्रचारानिमित्तानं नागपुरात आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "राज्यातील लोक महायुतीच्या सरकारवर नाराज आहेत. काही ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात त्यांची प्रचंड दहशत आहे. त्यामुळं लोक समोर येऊन बोलत नाहीत".
मविआ १७० जागा जिंकेल : महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला आहे, विर्दभात तर सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. त्यामुळं आमच्या (महाविकास आघाडीच्या) जवळपास १७० जागा निवडून येतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.
अदानींना विचारा, दूध का दूध पाणी का पाणी होईल : २०१९ला भारतीय जनता पक्षासोबत जाण्याच्या बैठकीत उद्योगपती गौतम अदानींसह कोण कोण उपस्थित होते, याबाबत अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला. त्यावर बोलताना रोहित म्हणाले, "माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की, अदानी यांना थेट विचारा की काय घडलं ते मग आपल्याला 'दूध का दूध पाणी का पाणी' काय ते कळेल. ज्यावेळी आपल्या हातातून निवडणूक जात आहे आणि मग कोणताही पर्याय शिल्लक राहात नाही, तेव्हा खोटं बोलावं लागतं". खोटे बोलून आपले उमेदवार निवडून यावे असा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न असावा. तो प्रयत्न अजित पवार यांच्याकडून करताना पाहायला मिळत आहे.
बॅग चेकिंग राजकारण तेजीत : या पूर्वी कधी सत्तेत असणाऱ्या लोकांच्या बॅगा तपासल्या गेल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावर त्यांनी सांगितलं, "तपासणी करायची असेल तर सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही करा, नाही तर दोघांचीही करू नका. बॅगा तपासणीवरून लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर, आता सत्तेतील लोकांच्या बॅगा निवडणूक आयुक्त तपासायला लागले आहे. ज्या लोकांनी बॅग तपासली त्यांना अभिनंदन पत्र निवडणूक आयोगानं दिलं, ही चांगली गोष्ट आहे. पण बॅगा न तपासणाऱ्यांवर काय कारवाई केली? ते पत्र समोर यायला हवं अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र पोलीस असताना बॅगा तपासण्यासाठी मध्यप्रदेश पोलीस कशासाठी आणता असा सवाल त्यांनी केला. लोकांना दाखवण्यासाठीच का होईना पण सत्तेतील लोकांच्या बॅगा तपासणी होत आहे ही चांगली गोष्ट आहे".
शरद पवार स्वस्थ बसणार नाहीत : शरद पवार मराठी माणसाचं प्रतीक आहे. भाजपानं महाराष्ट्राचा कमी गुजरातचा जास्त विचार केलाय. त्यामुळं आम्ही निश्चय केलाय राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आणि राज्याला विकासाचं एक नंबरचं राज्य बनवून दाखवायचं आहे.
हेही वाचा -
- भाजपा राष्ट्रवादीतील बोलणीसाठी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानींची बैठक; अजित पवारांचा गौप्यस्फोट, विरोधकांचा हल्लाबोल
- गौतम अदानींसोबत शरद पवारांची बैठक ही वस्तुस्थिती; मंत्री हसन मुश्रीफांनी केली अजित पवारांची पाठराखण
- "ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी"; विखेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची फटकेबाजी