मुंबई Devendra Fadnavis On Election : लोकसभेत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपानं आता आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मुंबईत भाजपानं गुरुवारी 'विजय संकल्प मेळावा' आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी नेते, आमदार, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसंच कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत 'फेक नेरेटिव्हचे बारा' वाजवायचे आहेत. मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा आपलाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय.
ही निवडणूक डोक्यावर घ्यायची : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "किरण शेलार यांच्यासारखा संघटनेतून तयार झालेला युवा उमेदवार आपल्याला भेटलाय. मुंबईच्या चाळीमध्ये जन्मलेला पक्का मुंबईकर म्हणजे किरण शेलार! आजही त्यांचे आई वडील मुंबईच्या बीडीडी चाळीत राहतात. निवडणुकीच्या निकालात शिकून पुढं जायचं असतं. त्यामध्ये पुढं जाताना पहिली संधी कुठली तर पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे. यापूर्वी मधु देवळेकर मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार होते. आपण हा मतदार संघ आपल्या मित्र पक्षांना दिला. परंतु आता जे आपलं आहे, ते आपल्याकडं परत आणण्याची सुवर्णसंधी आहे. पदवीधर निवडणूक प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची नोंदणी असते. आपण नोंदणी मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्यामुळं नोंदणीची पहिली लढाई आपण जिंकलोय. आता फक्त नोंदणीकृत झालेला मतदार पोलिंग स्टेशनपर्यंत जायला हवा. ही निवडणूक मनावर आणि डोक्यावरदेखील घ्यायची आहे. फेक नेरेटिव्हचे बारा वाजवायचे असतील तर हा विजय संपादित करणं फार गरजेचं आहे. अनेक वर्षानंतर मुंबई पदवीधर संघाचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
विधानसभेत चालणार नाही : पुढं ते म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मतं जास्त भेटली. पण महाविकास आघाडीला मतदान मुंबईकर आणि मराठी माणसानं केलं नाही. तसंच आमच्या उत्तर भारतीयांनीसुद्धा त्यांना मतदान केलेलं नाही. त्यांना नेमकं कुठून मतदान भेटलं हे आपण नीट बघितलं पाहिजे. गेले चार महिने त्यांनी 'इथं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू-भगिनो मातांनो' हे बोलणं सोडलं होतं. त्यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं. केवळ त्यांच्या मतांनी ते जिंकले आहेत. परंतु हे विधानसभेत आणि महानगरपालिकेत चालणार नाही. मुंबईकरांचा विश्वास केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे.
आता जिंकेपर्यंत हार नाहीत, फुलं नाहीत : "देशभरात 76 जागा आणि मुंबईत 13 जागा आपण फार कमी मतांनी हरलो. आपण सोशल मीडियावर तेवढ्या ताकदीनं उत्तर देऊ शकलो नाही. काही लोक डमरू वाजवत आहेत. त्या सर्वांना मी सांगू इच्छितो फेक नेरेटिव्ह एकदा चालतो, वारंवार चालत नाही. आम्ही बाउन्स बॅक करू. महाराष्ट्रामध्ये व्ही आर डाऊन बट नॉट आउट (कमी झालो, पण बाद झालो नाही) . आपण विधानसभेतही जास्त जागा घेऊ. महानगरपालिकेची निवडणूक कधी होऊ दे. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं आहे की फेक नेरेटिव्हमध्येसुद्धा आम्ही आमचा गड राखू शकतो. आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. शेवटी निवडणुकीमध्ये आपण जिंकणारच आहोत, या कारणाने कमी काम करणं अशी भावना तयार होणे घातक आहे. अशात काही चमको नेते तयार होणे सुद्धा त्याहून घातक आहे."
आता जिंकेपर्यंत हार नाहीत- "नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पारख ही हरल्यानंतरच होते. 2019 ला जेव्हा विजय मिळवूनसुद्धा सरकार गेलं. तेव्हा अनेक नेत्यांची पारख झाली. आताही देशात आपण सरकार बनवलं. अनेक राज्यात सरकार बनवलं. आपली परिस्थिती ही मान्सून सारखीच आहे. जिथे पाऊस पाहिजे होता, तिथे थोडा कमी पडला. पण जिथे अपेक्षा नव्हती, त्या ओडीसामध्ये पाऊस पडला. आता जिंकेपर्यंत हार नाहीत, फुलं नाहीत. सर्वांना काम करायचंय. त्यानंतर जोरात जल्लोष करू", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -
- देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाबाबत भाजपाचा ठराव, परंतु फडणवीसांचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच - Devendra Fadnavsi Resign Issue
- उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा का घेतला निर्णय? देवेंद्र फडणवीस राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच बोलले - DEVENDRA FADNAVIS ट
- महाराष्ट्रात भाजपाच्या सुमार कामगिरीचे साईड इफेक्ट्स; संघटनात्मक फेरबदलाची दाट शक्यता - BJP in Maharashtra