नागपूर Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणच्या घटनेवर कुणीही राजकारण करू नये. ही घटना आपल्या सर्वांसाठीच कमीपणा आणणारी घटना आहे. ही अतिशय दुःखद घटना आहे, पण त्याचवेळी योग्य चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे व तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे. या तिन्ही गोष्टींवर कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
"नौदलानं ही गोष्ट गांभीर्यानं घेतली असल्यामुळं त्यांनी चौकशी समिती तयार केली. ती समिती घटनास्थळी आली होती. त्यामुळं या संदर्भात चौकशी करून नौदल उचित कारवाई करेल. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच. घटनेसाठी कुठली गोष्ट जबाबदार होती किंवा काय त्याच्यामध्ये चुका राहिल्यात यासंदर्भातला रिपोर्ट चौकशी समिती देईल व नंतर कारवाई केली जाईल," अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
"पीडब्ल्यूडी विभागानं एक पोलीस तक्रार दाखल केली. नौदलाच्या रिपोर्टनंतर पोलीस विभाग देखील कारवाई करेल, त्यामुळं सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे की, आपण नौदलला मदत करून त्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी भव्य असा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत. त्यामुळं ही घटना झाल्यानंतर जे करण आवश्यक आहे ते केलं जात आहे," असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
चुका केल्या त्यांना शासन होईल : "विरोधकांनी या विषयाला धरून राजकारण सुरू केलंय, ते योग्य नाही. विरोधक आता प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढत आहेत. प्रत्येक गोष्टी निवडणुकीच्या चष्मातून बघू लागले आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. खालच्या स्तराला राजकारण त्यांनी करू नये. एवढेच सांगतो की, राज्य सरकार आणि नौदल एकत्रित येऊन ज्या काही चुका घडल्या आहेत, त्या चुका त्या ठिकाणी पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घेऊ. ज्यांनी चुका केल्यात त्यांना शासन होईल आणि छत्रपती शिवरायांचा भव्य अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा राहील. या संदर्भातली कारवाई सुरू केली," असं फडणवीस म्हणाले. या विषयाचं राजकारण करू नका आणि ते महाराष्ट्राला शोभत नाही, अशी विनंतीही फडणवीस यांनी विरोधकांना केली.
शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही : "शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना देखील माहीतचं आहे की हा पुतळा नौदलानं तयार केला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला नाही. भ्रष्टाचार कुठे होत असेल तर विरोध असला पाहिजे. शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचं वक्तव्य शोभत नाही," असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
हेही वाचा
- बदलापूर-मालवणमधील घटना महायुती सरकारला भारी पडू शकतात का? वाचा स्पेशल रिपोर्ट - Mahayuti government
- "वडिलांचा पुतळासुद्धा उद्धव ठाकरेंनी सरकारच्या..."; राजकोट राड्यानंतर नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
- "नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभारला", सिंधुदुर्गातील घटनेवर पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक आरोप - Chhatrapati Shivaji Maharaj Statue